26.09.2022 : राज्यपालांच्या हस्ते नॅशनल कॉलेज येथे प्राचार्य के. एम. कुंदनानी यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न
राज्यपालांच्या हस्ते नॅशनल कॉलेज येथे प्राचार्य के. एम. कुंदनानी यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न
उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विद्यार्थ्यांना सूचना
देशाच्या फाळणीनंतर मुंबई येथे येऊन एक पैसाही हाती नसताना प्राचार्य के एम कुंदनानी यांनी ध्येयाने प्रेरित होऊन नॅशनल कॉलेज सुरु केले व कालांतराने हैदराबाद सिंध बोर्डाच्या माध्यमातून विविध शिक्षण संस्था उभारल्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कुंदनानी यांच्याप्रमाणे जीवनात उच्च आदर्श पुढे ठेवून कार्य करावे व मातृभूमीची सेवा करावी असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्ड तसेच आर.डी. आणि एस.एच. नॅशनल कॉलेजचे संस्थापक विद्यासागर प्राचार्य के एम कुंदनानी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण वांद्रे मुंबई येथील संस्थेच्या परिसरात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला एचएसएनसी बोर्डाचे माजी अध्यक्ष किशू मनसुखानी, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, आर डी नॅशनल कॉलेजच्या प्राचार्य डाॅ नेहा जगतियानी, विश्वस्त प्रतिनिधी वंदन अगरवाल तसेच विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
सुरुवातीला अडचणी आल्या तरी देखील चांगल्या उद्दिष्टाने सुरु केलेले कार्य अंतिमतः पूर्णत्वाला जाते. प्राचार्य कुंदनानी व संस्थापक अध्यक्ष बॅरिस्टर होतचंद अडवाणी यांचे हेतू उदात्त होते. त्यांच्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनी जीवनात शिक्षक व्हावे, उद्योजक व्हावे किंवा शेतकरी व्हावे, परंतु ध्येय मात्र चांगले ठेवावे असे राज्यपालांनी सांगितले. आपण लहानपणी साधू वासवानी यांच्या विचारांनी प्रेरित झालो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी असे राज्यपालांनी सांगितले. महाविद्यालयाचे नाव नॅशनल कॉलेज असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी देशातील भाषांना महत्व द्यावे अशी सूचना राज्यपालांनी केली.
कॅपिटेशन फी घेतली नाही
हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्डाच्या कोणत्याही महाविद्यालयाने आजवर एक रुपया देखील कॅपिटेशन फी घेतली नाही असे सांगताना संस्थेच्या सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या मूल्य शिक्षणावर भर दिला असे एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख डॉ निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. सादर संस्था सिंधी अल्पसंख्यांक असली तरी देखील आज ८० टक्के विद्यार्थी बिगर सिंधी असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून पुढील चार वर्षात दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून साडेचार लक्ष विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे हिरानंदानी यांनी सांगितले.
यावेळी आर डी नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नृत्यावर आधारित रामायण नाट्य सादर केले तसेच संस्थेचा इतिहास सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली.