बंद

  26.08.2021: १३ वे आफ्टरनून न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार राजभवन येथे प्रदान

  प्रकाशित तारीख: August 26, 2021

  १३ वे आफ्टरनून न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार राजभवन येथे प्रदान

  लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, मंदाकिनी आमटे, उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

  देवेंद्र फडणवीस, नीलम गोऱ्हे, नरहरी झिरवाळ देखील उल्लेखनीय राजकीय कार्यासाठी सन्मानित

  पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, विठ्ठल कामत, मनोज वाजपेयी यांचा देखील सत्कार

  भारत देश हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला असून सृजनात्मक लोकांनी तो समृद्ध केला आहे. विविध क्षेत्रातील कलाकार कलेच्या माध्यमातून देशसेवाच करीत आहेत. आपल्या प्रतिभेचा उपयोग सर्वांनी समाजासाठी केल्यास आपण श्रेष्ठ भारत निर्माण करू शकू असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  राज्यपालांच्या हस्ते समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २४ व्यक्तींना १३ वे न्यूजमेकर्स अचिवर्स पुरस्कार राजभवन येथे गुरुवारी (दि. २६) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

  राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न लता मंगेशकर, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, मंदाकिनी आमटे व अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही, त्यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.

  राज्यपालांच्या हस्ते राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार देण्यात आले.

  मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, एमपीएससीचे सदस्य प्रताप दिघावकर, हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, अभिनेते मनोज वाजपेयी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, वकील मृणालिनी देशमुख, वसंत शिंदे, डॉ पराग तेलंग, रोहण दुआ, पत्रकार खलील शरीफ गिरकर, पत्रकार संजय जोग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुशांत सिन्हा, चेतन शशीतल, पोलीस अधिकारी सुनील कडासने व उषा पटेल यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आफ्टरनून व्हॉइस वृत्तपत्रातर्फे करण्यात आले होते. वर्तमान पत्राच्या मुख्य संपादिका वैदेही तमन यांनी सूत्रसंचलन व पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.