बंद

  26.04.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा

  प्रकाशित तारीख: April 26, 2022

  राज्यपालांच्या उपस्थितीत जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा

  भौगोलिक मानांकन व पेटंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  आजच्या युगात एखाद्या वस्तूला भागोलिक मानांकन किंवा पेटंट मिळाले तर ती देशाकरिता मोठी संपदा ठरते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे अधिकाधिक कृषी उत्पादनांचे भौगोलिक मानांकन व पेटंट प्राप्त करून देशातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थित राजभवन येथे मंगळवारी (दि. २६) आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

  कार्यक्रमाचे आयोजन बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ज्ञ प्रो गणेश हिंगमिरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी भौगोलिक मानांकन प्राप्त करणारे प्रगतिशील शेतकरी व उद्योजक उपस्थित होते.

  युरोपीय देश व चीन दरवर्षी हजारोंच्या संख्येने भौगोलिक मानांकन व पेटंट्स प्राप्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने मिशनरी उत्साहाने कार्य केल्यास देश पुनश्च गतवैभव प्राप्त करेल असे राज्यपालांनी सांगितले.

  यावेळी गणेश हिंगमिरे यांनी गोमुख येथील गंगाजलाच्या भौगोलिक मानांकनासाठी दाखल केलेला अर्ज राज्यपालांना सादर केला. भौगोलिक मानांकन प्राप्त केलेल्या उद्योजक व शेतकऱ्यांनी यावेळी राज्यपालांना केसर आंबा, बदलापूर जांभूळ व डहाणू चिकू यांच्या भौगोलिक मानंकानांचे तसेच राहुरी येथील कृषी विद्यापीठाने नोंदविलेल्या नानखटाईच्या पेटेंटचे प्रमाणपत्र सादर केले.