बंद

    26.03.2022: राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान

    प्रकाशित तारीख: March 27, 2022

    राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान
    गोविज्ञानातून रासायनिक खतांना पर्याय, पर्यावरणातील प्रदूषण देखील कमी करता येईल – राज्यपाल कोश्यारी

    भारतीय लोक आजही आपल्या प्राचीन संस्कृतीशी जुळले असून देशात गाय, गंगा, गीता व गायत्रीला वंदनीय मानले आहे. गौ उत्पादने आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झाले आहे. गौ उत्पादनांचा वापर केल्यास उत्तम आरोग्य राखण्यास मदत होईल तसेच गोविज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास रासायनिक खतांना पर्याय निर्माण करून पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी देखील मदत होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    मुंबई येथील गोरक्षक सेवा ट्रस्टच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त गोरक्षण सेवेसाठी देशाच्या विविध भागांमधील ४५ मान्यवरांना ‘गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान शनिवारी (दि. २६) राजभवन येथे प्रदान करण्यात आले त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

    यावेळी गौरक्षक सेवा ट्रस्टचे संस्थापक व गऊ भारत भारतीचे मुख्य संपादक संजय शर्मा ‘अमान’, फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष तरुण राठी व पटकथा लेखक विकास कपूर प्रामुख्याने उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी पुणे येथील बायोगॅस तज्ञ डॉ. संतोष सहाने, राजस्थानच्या कोटा येथील गौ वैज्ञानिक डॉ. महेंद्र कुमार गर्ग, डॉ. आर. एस. चौहान, डॉ. राजेंद्र तांबोळी, डॉ. रमेश पाटील, डॉ. प्रवीण निचट, डॉ. राजेश ढेरे, दिलीप कुमदास अमलानी, महेंद्र संगोई, राजेंद्र कुमार राणे, विक्रमसिंह राजपुरोहित, कालिदास पांडे, शत्रुघ्न प्रसाद, राजश्री राजेश तुडेयेकर, कॅप्टन ए. डी. माणेक, मुकुंद शांताराम व्यवहारे, फॅशन डिझायनर शायना एन सी, अनुजा झवेरी आणि डॉ. विजय गुप्ता यांसह ४५ लोकांना राष्ट्र सेवा सन्मान देण्यात आले.