बंद

  26.01.2022 : प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे भाषण

  प्रकाशित तारीख: January 26, 2022

  महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री भगत सिंह कोश्यारी यांचे २६ जानेवारी २०२२ रोजी भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभातील भाषण

  बंधू आणि भगिनींनो,

  जय महाराष्ट्र!

  1. सर्वप्रथम मी देशाच्या प्रजासत्ताकाच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.

  2. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारक यांना देखील माझे विनम्र अभिवादन.

  3. भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे आणि म्हणूनच आपल्या राज्याला देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ संबोधले जाते. यानिमित्ताने राज्यात आपण विविध कार्यक्रमही आयोजित करीत आहोत.

  4. गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावी लागेल.

  5. पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेने घेतली. नुकताच स्कॉटलंड येथे महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप’ पुरस्कार मिळाला.

  6. इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे देशातल्या पर्यावरण आणि वाहन उद्योगामध्ये नव्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सार्वजनिक वाहतुकीचे पूर्ण विद्युतीकरण हे लक्ष्य आपण ठेवले असून मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवातही झाली आहे.

  इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या स्थानिक नागरी संस्थांमधील नागरिक, गृहनिर्माण संस्था यांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात सर्व शासकीय विभागांनी इलेक्ट्रिक वाहने वापरावीत यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

  7. गेल्या दोन वर्षांपासून कोविडशी मुकाबला करीत असतांना, अर्थचक्र थांबू न देता, केवळ गर्दीवर निर्बंध घालण्याचे राज्य सरकारचे नियोजन देशात वैशिष्ट्यपूर्ण ठरले.

  8. कोविडचा नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने ‘मुंबई मॉडेल’ चे कौतूक केले आहे. मुंबई उच्च न्यायालय, नीती आयोग तसेच जागतिक आरोग्य संघटनेने देखील महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. हे सर्व यश केवळ प्रशासनाचे नसून फ्रंट लाईन वर्कर्स, डॉक्टर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आहे आणि म्हणून या करोना योद्ध्यांचे मी मनापासून कौतुक करतो. अर्थात यापुढे देखील बेसावध राहून चालणार नाही. आरोग्यासाठी स्वयंशिस्त खूप आवश्यक आहे.

  9. गेल्या दोन वर्षात उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, पर्यावरण, पर्यटन, वने, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, अशा प्रत्येक विभागांनी नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे.

  10. माझ्या शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला. शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली आणि बत्तीस लाख शेतकऱ्यांना वीस हजार दोनशे चौतीस कोटी रुपये इतकी कर्जमाफी देऊन त्यांना मोठा दिलासा दिला.

  11. शेतकऱ्याला आपल्या पायावर भक्कमपणे उभे करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविला जात आहे. स्पर्धेच्या वातावरणात शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, शेतमालाच्या सर्वसमावेशी मुल्य साखळ्या विकसीत करणे, त्याचबरोबर विकेल ते पिकेलच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना अधिक बळ देणे सुरू आहे. याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होत आहे. आज राज्यात पाच हजार शेतकरी गट तसेच कंपन्यांना थेट खरेदीदारांशी जोडण्यात येत आहे.

  12. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःला समर्थ करावे यासाठी ई-पीक पाहणी हे मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्याअखेर सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांनी हे मोबाईल अप्लिकेशन डाऊनलोड करुन या योजनेचा लाभ घेतला आहे.

  13. अक्षय उर्जा म्हणजेच नवीकरणीय उर्जेचे धोरण आणून, महाराष्ट्राने ऊर्जा क्रांती आणली आहे. छतावरील सौर ऊर्जेपासून ते कृषी पंपापर्यंत किंवा पडीक जमिनीवर सुद्धा ही उर्जा, क्रांती करणार आहे. शेतकऱ्यांना किफायतशीर आणि दिवसा सुनिश्चित विजपुरवठा होण्यासाठी कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर उर्जेद्वारे विद्युतीकरण करणे सुरू आहे. नवीन अपारंपारिक उर्जा निर्मिती धोरणानुसार पाच लाख सौर कृषीपंप बसविण्यात येत आहेत.

  14. जलस्त्रोतांची विशेष दुरुस्ती करून सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राज्यात राबवत असून सुमारे आठ हजार जलस्त्रोत योजनांची दुरुस्ती करण्यात येत आहे.

  15. राज्याने गेल्या दोन वर्षांत विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणली. एक लाख अठठयाएंशी हजार त्र्याहत्तर कोटी रुपयांचे शहाण्णव सामंजस्य करार केले. ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत राज्यामध्ये एक लाख एकाहत्तर हजार आठशे सात कोटी रुपये रकमेची थेट विदेशी गुंतवणूक झाली.

  16. राज्याने पर्यटन क्षेत्रामध्ये काही मूलभूत बदल करून त्याला संजीवनी दिली. आतिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला तसेच परवान्यांची संख्या कमी केली आणि अनेक करांत सवलती दिल्या. या क्षेत्रात रोजगारवाढीची मोठी संधी असून, हे रोजगार स्थानिकांना मिळतील असे पाहिले. कृषी पर्यटन, साहसी पर्यटन तसेच इतर नवनवीन उपक्रम सुरू केले.

  17. मुंबई जागतिक दर्जाचे पर्यटन शहर झाले पाहिजे असे आमचे नियोजन आहे. वरळी येथील शासकीय दूध योजनेच्या चौदा एकर जागेवर एक हजार कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे.

  18. पायाभूत सुविधा कामे व रस्ते बांधकामात राज्याने मोठी आघाडी घेतली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे पंच्चाहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच हा महामार्ग वाहतुकीसाठी अंशतः खुला करण्यात येईल.

  19. याशिवाय मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढवून प्रवासाचा वेळ आणखी कमी करणे, वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू, कोकण द्रुतगती महामार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, सागरी महामार्गाचे उन्नतीकरण, पुणे शहरा भोवतालचा चक्राकार वळण मार्ग, रेवस – रेड्डी रस्ता सागरी महामार्ग, वर्सोवा-विरार सागरी मार्ग, समृद्धी महामार्गास जोडणारा जालना ते नांदेड द्रुतगती महामार्ग, असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

  20. मुंबईची वाहतूक गतिमान करणाऱ्या कोस्टल रोडचे कामही पन्नास टक्के पूर्ण झाले असून संपूर्ण प्रकल्प डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण होईल अशी आशा आहे. केवळ देशातच नव्हे तर जगात हा प्रकल्प नावाजला जाईल.

  21. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी नुकतीच मुंबई महानगरपालिकेने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधा सुरू केली आहे. अशी सुविधा इतरही महानगरपालिकांमध्ये असावी यादृष्टीने नियोजन करीत आहोत.

  परिवहन विभागाने देखील त्यांच्या सुविधा ऑनलाइन करून नागरिक, वाहतूकदार यांना मोठा दिलासा दिला आहे.

  22. मुंबई महानगर, पुणे, नागपूर याठिकाणी वेगाने मेट्रोची कामे सुरू असून लवकरच त्यातील काही टप्पे वाहतुकीला खुले होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई महानगरात एकशे अठ्ठ्यात्तर किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग टाकणे सुरू आहे. देशातील एकमेव अशा साडे तेहतीस किलोमीटर लांबीच्या पुर्णत: भूमिगत मुंबई मेट्रो लाईन तीन ( कुलाबा-वांद्रे- सिप्झ ) प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून त्याचीही एकाहत्तर टक्के प्रगती झाली आहे. पुणे महानगर प्रदेशात मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. नागपूर मेट्रो प्रकल्पातील सुमारे पंचवीस किलोमीटर लांब प्रवासी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

  23. महिला खरेदीदारांना मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्के सवलत देण्याचा क्रांतिकारी निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे. शिवाय मुंबईत ऐतिहासिक बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. लवकरच धारावी पुनर्विकासाचे कामही मार्गी लागेल असा विश्वास आहे .

  24. सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतुन शहरी भागात पंधरा लाख अडतीस हजार घरकुले बांधण्यात येत आहेत. ग्रामीण भागात महाआवास अभियानामधून चार लाख चव्वेचाळीस हजार घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. यावर्षीही हे अभियान राबविण्यात येत असून याद्वारे पाच लाख घरकुले बांधून पूर्ण करण्यात येतील.

  25. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना शुद्ध, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी ‘हर घर नलसे जल’ योजना राबविण्यात येत आहे. शासनाने सुमारे पंचाण्णव टक्के नळ जोडण्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामुळे घराघरात नळाने पाणी येऊन लोकांचे विशेषतः महिलांचे कष्ट कमी होणार आहेत.

  26. महिला आणि मुलांवरील अत्याचाराला कठोरपणे आळा बसण्यासाठी नुकताच विधिमंडळात शक्ती कायदा देखील संमत करण्यात आला आहे.

  27. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करुन देण्यासाठी माझ्या शासनाने राज्यातील गड व किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाची योजना हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात सहा किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येत आहे.

  28. राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्याचे आणि जागतिक नकाशावर राज्याचे नाव कोरण्याचे उद्दिष्टय ठेवले आहे. विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करून नवी मुंबई येथे ‘स्पोर्टस सिटी’ उभारण्याचा शासनाचा मानस आहे.

  29. संकटाचे संधीत रूपांतर करून, राज्य शासनाने आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढविल्या. प्रयोगशाळा, बेडसची संख्या आणि वैद्यकीय साधन सामुग्री मोठ्या प्रमाणावर वाढविली. देशात पहिल्यांदाच तज्ञ डॉक्टर्सचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स निर्माण केले. बालकांसाठी वेगळा टास्क फोर्स उभा केला. एकूणच आरोग्य क्षेत्रातील सर्व संबंधित तज्ञ, अभ्यासक, संशोधक यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत आपण पुढे जात आहोत.

  30. गेल्या दोन वर्षांत महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत सुमारे साडे चौदा लाख मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि सुमारे दोन हजार सहाशे कोटी रुपये यासाठी रुग्णालयांना देऊन गरिबांवरील आर्थिक ताण कमी केला आहे.

  31. राज्य सरकारने कोविड काळात गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात भोजन देण्यासाठी शिवभोजन थाळी मोफत दिली. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून पंचवीस लाख मजुरांना रोजगार उपलब्ध करुन दिला. बांधकाम कामगार, आदिवासीना खावटी कर्ज, रिक्शा, टॅक्सी चालक, पालक गमावलेले बालक, विधवा महिला, निराधार योजनेतील निवृत्ती वेतन धारक या सर्वाना या संकटात आधार देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

  32. माझ्या शासनाने ग्रामीण व शहरी भागातील गाव, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे रद्द करुन त्यांना समताधिष्ठित किंवा महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे.

  33. अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यात तेवीस ठिकाणी शैक्षणिक संकुलांमध्ये वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत. मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज यासारख्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

  34. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये सीटी सर्व्हेलन्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. आता पोलीस घटक मुख्यालय, उपविभागीय पोलीस मुख्यालय या ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. महिलांची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, गुन्हे शोध, कायदा व सुव्यवस्था राखणे इत्यादींकरीता याचा उपयोग होत आहे.

  35. साहित्य व संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच वाचनाची चळवळ अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे.

  36. तरुणांमधील कल्पकतेला चालना देण्यासाठी माझे शासन स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहे. स्टार्टअप्स आणि प्रारंभिक टप्प्यातील उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे बौद्धीक मालमत्ता हक्क म्हणजेच पेटंट मिळविण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येत आहे.

  37. राज्याचा जैविक वारसा जपण्यास माझे शासन कटिबद्ध आहे. यासाठी राज्यात नव्याने चार जैविक वारसास्थळे घोषीत करण्यात आली आहेत. पश्चिम घाट तसेच विदर्भातील वन्यजीव कॉरिडॉर अधिक मजबूत करण्यासाठी नऊ संवर्धन राखीव क्षेत्रे अधिसूचित करण्यात आली आहेत. वन्यजीव कृती आराखडा स्विकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

  38. महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणात देखील सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामीण भागासह आता शहरांनीही स्वच्छता चळवळीला आपलेसे केले आहे.

  39. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी माझे शासन काम करीत आहे.

  40. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा असे आवाहन करतो व सर्वांना पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो.

  जय हिंद ! जय महाराष्ट्र !