बंद

    25.11.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील मार ग्रेगोरियस ऑर्थोडॉक्स चर्चची सुवर्ण जयंती साजरी । सर्वोच्च धर्मगुरूंची उपस्थिती

    प्रकाशित तारीख: November 25, 2023

    राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील मार ग्रेगोरियस ऑर्थोडॉक्स चर्चची सुवर्ण जयंती साजरी । सर्वोच्च धर्मगुरूंची उपस्थिती

    ऑर्थोडॉक्स चर्चने भारतीय मूल्ये जपली : राज्यपाल रमेश बैस

    चर्चने मानवतेच्या उत्थानासाठी कार्य करावे : धर्मगुरु बॅसिलियस मार्थोमा मॅथ्यूज

    येशू ख्रिस्त हयात असतानांच त्यांचे प्रेषित असलेल्या सेंट थॉमस यांनी स्थापन केलेल्या ऑर्थोडॉक्स चर्चने हिंदू धर्मातील अनेक चालीरीती स्वीकारल्या व भारतीय जीवन मूल्ये जपली. चर्चने शिक्षण, आरोग्य, दिव्यांगांची सेवा यांसह अनेक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देताना ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेचा पुरस्कार केला आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

    इंडियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या चेंबूर मुंबई येथील ‘मार ग्रेगरियस ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च’चा सुवर्ण महोत्सव राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २५) व्ही एन पूर्व मार्ग चेंबूर येथे चर्चच्या सभागृहात संपन्न झाला,त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

    सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला केरळहून आलेले ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च धर्मगुरु बॅसिलियस मार्थोमा मॅथ्यूज तृतीय, मुंबईचे मुख्य बिशप गीवर्गीस मार कुरीलोस, केरळच्या अंगमॅली धर्मप्रांताचे बिशप डॉ यूहानॉन मार पॉलिकार्पोस, अहमदाबाद धर्मप्रांताचे बिशप गीवर्गीस मार थिओफिलोस, चेंबूरच्या ग्रेगोरियस चर्चचे मुख्य धर्मगुरु फादर जॉय स्कारिया, पी जे चांडी, फिलिप मम्मेन तसेच निमंत्रित उपस्थित होते.

    ऑर्थोडॉक्स चर्चेने केरळ सह देशात उत्कृष्ट विद्यालयांची शृंखला स्थापन करून लोकांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यात योगदान दिल्याचे सांगून चर्चने मुंबई, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याचे राज्यपालांनी सांगितले. चर्चच्या वतीने नेरुळ येथे कर्करुग्णांसाठी निवारा सुरु करून त्यांना औषधोपचार व परिवहन आदी सुविधा दिल्या जात असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

    महाराष्ट्राचे माजी राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर हे ऑर्थोडॉक्स चर्चचे सदस्य होते. त्यांचा श्रीमद भगवद गीतेचा उत्तम अभ्यास होता व भगवद गीतेवर त्यांनी चांगले पुस्तक देखील लिहिले होते, अशी आठवण राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितली.

    विविध धर्म व संस्कृतींनी नटलेला भारत देश एका सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे असून ऑर्थोडॉक्स चर्च त्यातील एका सुंदर फुलाप्रमाणे आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. ऑर्थोडॉक्स चर्चची स्थापना सन ५२ साली येशू ख्रिस्तांचे प्रेषित दूत सेंट थॉमस यांनी केरळ येथे केली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते चर्चच्या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

    ऑर्थोडॉक्स चर्चने मानवतेच्या उत्थानासाठी कार्य करावे : धर्मगुरु बॅसिलियस मार्थोमा मॅथ्यूज

    भारतात १४० कोटी लोकांपैकी अनेक लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. आपल्याकडे आहे ते इतरांसोबत वाटणे हा सच्चा धर्म आहे. ईश्वराच्या लेकरांची सेवा केली तर ती ईश्वराचीच सेवा ठरेल, असे सांगून ऑर्थोडॉक्स चर्चने मानवतेच्या उत्थानासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च धर्मगुरु बॅसिलियस मार्थोमा मॅथ्यूज तृतीय यांनी यावेळी संबोधित करताना केले.

    केनियातील पर्यावरण कार्यकर्त्या व नोबल पारितोषिक विजेत्या वंगारी मथाई यांच्या जीवन कार्याचे स्मरण देऊन जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने निसर्ग रक्षणासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

    चेंबूर येथील ग्रेगोरियस चर्चची स्थापना सन १९७२ साली झाली. ग्रेगरियस हे ऑर्थोडॉक्स चर्चचे भारतीय संत होते असे चर्चचे मुख्य धर्मगुरु फादर जॉय स्कारिया यांनी सांगितले.

    मुंबईचे मेट्रोपॉलिटन गीवर्गीस मार कुरीलोस यांचे देखील समयोचित भाषण झाले. पी जे चांडी यांनी आभारप्रदर्शन केले.