25.11.2022: राज्यपालांच्या उपस्थितीत पाञ्चजन्य साप्ताहिकातर्फे आयोजित ‘२६/११ मुंबई संकल्प’ या कार्यक्रमाचा समारोप संपन्न
पाञ्चजन्य’ द्वारे आयोजित संकल्प सभेला राज्यपाल, उपमुख्यमंत्री उपस्थित
२६ नोव्हेंबर अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांचे बलिदान देश विसरणार नाही : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
चौदा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या देशाच्या शूरवीर हुतात्म्यांच्या कुटुंबियांनी सहन केलेले दुःख हे संपूर्ण देशवासीयांचे तसेच ते जगातील सर्व शांतताप्रेमी लोकांचे देखील दुःख आहे. मुंबईने स्वातंत्र्यापूर्वी ‘छोडो भारत’चा इशारा दिला होता. त्याप्रमाणेच ‘२६ नोव्हेंबर विसरणार नाही आणि माफ करणार नाही’ हा संपूर्ण देशाचा निर्धार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
मुंबईवर झालेल्या २६ /११ अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेले वीर जवान, पोलीस अधिकारी तसेच नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पाञ्चजन्य’ साप्ताहिकातर्फे आयोजित ‘२६/११ मुंबई संकल्प’ सभेचा समारोप राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २५) हॉटेल ताज महाल मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
जे लोक इतिहास विसरतात, त्यांना इतिहास विसरतो, त्यामुळे हुतात्म्यांना विसरू नये असे सांगताना मुंबई येथे हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मृती सभेचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी पाञ्चजन्य साप्ताहिकाचे अभिनंदन केले. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी संपादक राहिलेल्या पाञ्चजन्य वार्तापत्राने पत्रकारितेसोबत नागरिकांमध्ये देशभक्तीची मूल्ये रुजवली असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी त्यांनी पांचजन्य मासिकासंबंधी आपल्या आठवणी सांगितल्या.
सार्वभौमत्वावर हल्ला
२६ नोव्हेंबर अतिरेकी हल्ला हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होता असे सांगून मुंबईने या हल्ल्यामुळे विचलित न होता विकासाची घोडदौड सुरूच ठेवली असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यात जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा मोठी क्षमता असलेले वाढवण बंदर तयार होत असून हे बंदर तसेच समृद्धी महामार्गामुळे संपूर्ण राज्य बंदराशी जोडले जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी भारत प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक भारत भूषण अरोडा, पाञ्चजन्यचे संपादक हितेश शंकर, उपसंपादक दिनेश मनसेरा व अश्वनी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.