25.07.2021: कच्छ युवक संघातर्फे २४ करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सत्कार
कच्छ युवक संघातर्फे २४ करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सत्कार
गरीब रुग्णांची सेवा हीच खरी ईशसेवा : राज्यपाल
दुसऱ्यांचे दुःख जाणून त्यांची सेवा करण्याचा संदेश नरसी मेहता, समर्थ रामदास, तुलसीदास यांसह सर्वच संतांनी दिला असल्याचे सांगून समाजातील उपेक्षित, गरजू आणि गरीब लोकांमध्ये देवत्व पाहून त्यांची केलेली सेवा हीच खरी ईशसेवा असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
टेलीमेडिसिनच्या माध्यमातून करोना रुग्णांची तसेच गृह विलगीकरणात असलेल्या गरजू लोकांची सेवा करणाऱ्या मुंबईतील कच्छ समाजातील २४ डॉक्टरांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २५) राजभवन येथे सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन मध्य मुंबईतील कच्छ युवक संघ या संस्थेतर्फे करण्यात आले होते.
आपण कच्छ येथे जाऊन आलो असून कच्छ येथील लोकांमध्ये सेवाभाव व आदरातिथ्य प्रकर्षाने दिसून आले. मुंबईतील कच्छ समाजातील डॉक्टरांनी करोना काळात गरजूंना रुग्णसेवा देऊन हा सेवाभाव जागृत असल्याचे दर्शविले असे प्रशंसोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
माटुंगा वडाळ्याच्या नगरसेविका नेहल शाह, कच्छ युवक संघाचे अध्यक्ष धीरज छेडा, संस्थापक विश्वस्त तलाक्षी फुरिया, नवनीत प्रकाशाचे बिपीन गाला, जयंत छेडा, रिषभ मारू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते डॉ. हिरेन गाला, डॉ. निमित्त नागडा, डॉ. हरिष गोशर, डॉ. सोहिल गाला, डॉ.पारस देढिया, डॉ. विशाल लापशिया, डॉ. सेजल गोगरी, डॉ. रुपल गाला, डॉ. भावना विनोद गडा, डॉ. साहिल छेडा, डॉ. राजुल गडा, डॉ. अनिशा रचित शाह, डॉ. क्रिणा छेडा, डॉ. तनवी शाह, डॉ. आरती नंदू, डॉ. प्रविणा सावला, डॉ. भावीन विसारिया, डॉ. जय सावला, डॉ. जयेश कपाडिया, डॉ. हेता करानी, डॉ निरव छेडा, डॉ. प्रियंका मोटा, डॉ. राजू गाला, डॉ. निलम गडा या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. मिता विरा, प्रणीता सोनवडेकर, कोमल फोफरिया व भारती संगोई या करोना योद्ध्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
****