बंद

    25.06.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत युरोप दिन साजरा

    प्रकाशित तारीख: June 25, 2024

    राज्यपालांच्या उपस्थितीत युरोप दिन साजरा
    युरोपमधील देशांनी विद्यापीठांमध्ये भारत विषयक अभ्यासक्रम राबवावे*  : राज्यपाल रमेश बैस 

    भारत व युरोपीय देशांचे संबंध अनेक शतकांपासून चालत आले असून भारतीय राज्यघटनेत अनेक युरोपीय देशांच्या राज्यघटनांची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.  भारताची अर्थव्यवस्था सातत्याने वाढत असून यूरोपीय  राष्ट्रांनी उद्योग, व्यापाराशिवाय आता भारतातील आणि विशेषतः राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे तसेच आपल्या विद्यापीठांमध्ये भारत विषयक अभ्यासक्रम राबवावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. 
    राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध देशांच्या वाणिज्यदूतांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २५) मुंबई येथे ‘युरोप दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.  
    ‘द काउंसिल ऑफ युरोपियन युनिअन (ईयू) चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया’तर्फे या भारत – युरोप व्यापार वृद्धीसाठी कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे युरोप दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  भारत आज जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणूनही उदयास आले आहे. वाढती वृद्ध लोकसंख्या असलेले जगातील प्रगत देश त्यांच्या कुशल मनुष्यबळाचा गरजेसाठी भारताकडे पाहत आहेत. भारतात कार्यरत असलेल्या युरोपिय कंपन्यांनी युवकांच्या कौशल्य वर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावल्यास त्याचा फायदा भारताइतकाच युरोपियन देशांनाही होईल असे राज्यपालांनी सांगितले.  
    विद्यापीठांशी सहकार्य वाढवताना युरोपमधील देशांनी आपापल्या विद्यापीठांमध्ये ‘इंडॉलॉजी’ सारखे अभ्यासक्रम राबवावे तसेच संस्कृत भाषेसह हिंदी व इतर भारतीय भाषांच्या अध्ययन – अध्यापनाला चालना द्यावी अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. भारतीय स्वातंत्र्य चळवळ फ्रेंच राज्यक्रांतीच्या ‘स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता’ या ब्रीद वाक्याने प्रेरित होती. देशाच्या राज्यघटनेने ब्रिटिश, आयरिश, फ्रेंच, जर्मन आणि इतर राज्यघटनांमधूनही काही वैशिष्ट्ये घेतली आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांनी तसेच सामायिक मूल्यांनी भारत युरोपियन राष्ट्रांशी जोडले आहे असे नमूद करून भिन्न राष्ट्रे परस्पर सीमा व मतभेदांवर मात करून समान ध्येयांसाठी कसे एकत्र काम करू शकतात याचे युरोपिअन संघ उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले. .

    आज युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याचप्रमाणे भारत देखील हा युरोपियन युनियनसाठी नववा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. 
    भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे असून देशाची अर्थव्यवस्था चांगल्या गतीने वाढत आहे. त्यामुळे आपले आर्थिक संबंध अधिक दृढ आणि सुधारण्यासाठी सध्याची योग्य वेळ आहे, असे राज्यपालांनी नमूद केले. 
    भारत आणि युरोपियन संघ यांच्यात ‘मुक्त व्यापार करार’ करण्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. या करारामुळे व्यापारातील अडचणी  कमी करण्यात मदत होईल आणि वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.
     
    युरोप मधील देशांना भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता युरोपीय देशांमधून देखील अधिकाधिक पर्यटक भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात यावेत अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. भारतीय चित्रपट उद्योगाच्या शक्तीचा पर्यटन वाढविण्यासाठी उपयोग करावा असे राज्यपालांनी सांगितले.  
    युरोपने दरवर्षी भारतात भव्य ‘युरोपियन युनियन’ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे. तसेच ‘नमस्ते इंडिया’ आणि ‘महाराष्ट्र महोत्सव’ हे कार्यक्रम युरोपियन युनियन देशांमध्येही आयोजित करावे असे राज्यपालांनी सांगितले. 
     युरोपिअन युनिअन देशांच्या ४५०० कंपन्या भारतात कार्यरत असून त्या एकूण ६० लाख लोकांना नोकऱ्या – रोजगार देत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात भारत – युरोपिअन युनिअन संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी व्यक्त केला. युरोपिअन युनिअन चेम्बर्सचे अध्यक्ष पीयूष कौशिक यांनी चेम्बर्सच्या कार्याची माहिती दिली तर संचालिका डॉ रेणू शोम यांनी आभार प्रदर्शन केले.   
    कार्यक्रमाला चित्रपट निर्माते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, युरोपिअन युनिअन चेम्बर्सचे उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जी यांसह व्यापार व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.