25.03.2022 : राज्यपाल, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी साधला नक्षलग्रस्त भागातील युवकांशी संवाद
राज्यपाल, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी साधला नक्षलग्रस्त भागातील युवकांशी संवाद
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृह तसेच युवक व क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांचेसह देशाच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधून मुंबई भेटीवर आलेल्या युवक-युवतींशी राजभवन येथे संवाद साधला. यावेळी बिहारच्या नक्षलग्रस्त गया, जमुई, लखीसराय तसेच तेलंगणा राज्याच्या खम्मम येथील २१८ युवक युवती उपस्थित होते.
आपण कितीही लहान गावातून आलो असलो तरीही उच्च ध्येय, कठोर परिश्रम व प्रामाणिकपणामुळे जीवनात प्रगती करू शकतो असे राज्यपालांनी आदिवासी युवक युवतींना सांगितले.
नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील युवकांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने तसेच नेहरू युवक संघटन केंद्राच्या पुढाकारातून १३ व्या आदिवासी युवक आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून युवक युवतींची राजभवन भेट तसेच राज्यपालांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवक युवतींनी आपले अनुभव कथन केले.
कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे महासंचालक नितेश कुमार मिश्रा, नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र निदेशक प्रकाश कुमार मनुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.