बंद

    25.01.2022: ‘वाल्मिकी रामायण, रामचरितमानस प्रमाणे ‘वंदेमातरम’ नित्यनूतन, प्रेरणादायी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: January 26, 2022

    ‘वाल्मिकी रामायण, रामचरितमानस प्रमाणे ‘वंदेमातरम’ नित्यनूतन, प्रेरणादायी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    वाल्मिकी रामायण तसेच तुलसीदासांच्या रामचरित मानस प्रमाणे बंकीम चंद्र यांचे वंदे मातरम हे काव्य व त्याचे सांगीतिक सादरीकरण कधीही जुने न होणारे असे नित्यनूतन व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिवंगत गायक-संगीतकार विनायक देवराव अंभईकर यांनी संगितबद्ध केलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम्’वर आधारित नव्या सांगीतिक रचनेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २५) राजभवन, मुंबई येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी संपूर्ण वंदेमातरमचे रचनेचे गायक मंदार आपटे, गायिका स्वाती आपटे व अर्चना गोरे, निर्माते नचिकेत अंभईकर, दिवंगत विनायक अंभईकर यांचे कुटुंबीय, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, एजियाज फेडरलचे उपाध्यक्ष राजेश आजगावकर, वन्दे मातरमच्या नृत्य दिग्दर्शिका पूजा पंत, पखवाज वादक चंद्रशेखर आपटे, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    ‘आनंदमठ’ कादंबरी लिहिली गेली त्यावेळी बंकीम चंद्र यांनी त्यातील वंदे मातरम ही रचना अजरामर होईल अशी कल्पना देखील केली नसेल असे सांगून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ‘वंदे मातरम’ हे प्रेरणा गीत ठरले तसेच अनेक क्रांतिकारक ‘वंदे मातरम’ चा उद्घोष करीत वधस्तंभावर गेले असे राज्यपालांनी सांगितले.

    वंदे मातरम या गीताला शेकडो संगीतकारांनी संगीतबद्ध केल्याचे नमूद करून विष्णू सहस्त्रनामाप्रमाणे या रचना नेहमीच प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी मंदार आपटे व अर्चना गोरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘ने मजसी ने’ हे गीत सादर केले.