बंद

    25.01.2022: गिरीश वालावलकर यांच्या ‘एके दिवशी’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    प्रकाशित तारीख: January 25, 2022

    गिरीश वालावलकर यांच्या ‘एके दिवशी’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी डॉ. गिरीश वालावलकर यांनी लिहिलेल्या ‘एके दिवशी’ या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन संपन्न झाले.

    पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अभिनेते संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक अजित भुरे, मेहता पब्लिशिंगचे अखिल मेहता, लेखक डॉ गिरीश वालावलकर तसेच डॉ. अलका वालावलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

    महाराष्ट्रात येण्यापूर्वी बंगाली भाषेत विपुल साहित्य असल्याचे आपले मत होते. परंतु महाराष्ट्रात आल्यावर मराठी भाषेत कितीतरी थक्क करणारे आणि सुंदर साहित्य असल्याचे आपल्या लक्ष्यात आल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. प्रादेशिक भाषांमध्ये उत्तमोत्तम चांगले साहित्य असून हे समाजासमोर आले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. डॉ गिरीश वालावलकर यांचे शिक्षण विज्ञान विषयातील असून त्यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.

    डॉ गिरीश वालावलकर हे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सीईओ म्हणून काम करीत असतानाच त्यांनी वैविध्यपूर्ण लिखाण केले आहे. ‘एके दिवशी’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी प्रचलित परिस्थितीतल्या जगाचे अभ्यासपूर्ण व साहित्यमूल्य असलेले लिखाण केले असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले. डॉ वालावलकर यांच्या पुस्तकावरून मालिका व चित्रपट होण्याच्या असंख्य संभावना असल्याचे अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

    युवा उद्योजकांना नवा उद्योग सुरु करताना सुरुवातीला अनेक आर्थिक अडचणी येतात. अश्यावेळी उद्योजक आर्थिक गुन्हेगारांच्या कचाट्यात सापडू शकतात. या दृष्टीने कथानकाच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे लेखक डॉ गिरीश वालावलकर यांनी सांगितले.