24.12.2024 : राज्यपालांच्या हस्ते ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचे वितरण
संगीत माणसाला जोडण्याचे काम करते – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
राज्यपालांच्या हस्ते ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचे वितरण
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २४) वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात १९ व्या ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ‘स्पंदन आर्ट’ संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीत ही कला जात, धर्म, पंथ, भाषा या पलिकडे जाऊन माणसाला जोडण्याचे काम करते, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.
चित्रपट सृष्टीमधील आघाडीच्या व सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या मजरुह सुलतानपुरी यांना या वर्षीचा ‘मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार’ (मरणोत्तर) तसेच हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू, उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या जावेद अली यांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार २०२४’ ने राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मजरुह सुलतानपुरी यांचा जीवनगौरव पुरस्कार त्यांचे पुत्र अंदलिब मजरुह सुलतानपुरी यांनी स्वीकारला. एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे ‘मोहम्मद रफी पुरस्कारा’चे स्वरूप आहे.
कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ॲड. प्रतिमा शेलार तसेच मोहम्मद रफी, मजरुह सुलतान पुरी व जावेद अली यांचे कुटुंबीय व संगीत प्रेमी उपस्थित होते.
यावेळी ‘फिर रफी’ या बहारदार मैफिलीत प्रसिद्ध गायक श्रीकांत नारायण यांनी मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर केली.