बंद

    24.10.2021: विद्यादानासाठी मदत करण्याचा मटा हेल्पलाईनचा उपक्रम प्रशंसनीय’

    प्रकाशित तारीख: October 24, 2021

    विद्यादानासाठी मदत करण्याचा मटा हेल्पलाईनचा उपक्रम प्रशंसनीय’

    ‘उद्यमी व्हा, परिश्रम करा आणि इतरांना जीवनदान द्या’: राजभवन येथील भावपूर्ण सोहोळ्यात राज्यपालांचे विद्यार्थ्यांना आवाहन

    अतिशय कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. आपले स्वतःचे लहानपण देखील अतिशय खडतर परिस्थितीत गेले आहे. मात्र जो स्वतःला मदत करतो, देव त्यालाच मदत करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खंबीर व्हावे, कठोर परिश्रम करावे, नौकरी – उद्योग करावे व यशस्वी झाल्यावर आपण देखील समाजातील गरजूंना शिक्षणाच्या माध्यमातून जीवनदान द्यावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
    विपरीत परिस्थितीत उत्तम गुणांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टाइम्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने उच्च शिक्षणासाठी मटा वाचकांच्या माध्यमातून मदत करण्यात आली. या विद्यार्थ्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २४) राजभवन येथे प्रातिनिधिक स्वरुपात ‘मटा हेल्पलाईन विद्यार्थी धनादेश’ देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
    विद्यादान हा एक यज्ञ आहे. महाराष्ट्र टाइम्सने चौदा वर्षांपासून हेल्पलाईनच्या माध्यमातून केलेल्या विद्यादानाच्या या यज्ञामुळे जवळजवळ ५०० होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत तेवत आहे. हेल्पलाईनचे हे कार्य अद्भुत, प्रशंसनीय आहे. मटाने या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवे जीवन देऊन समाजापुढे एक चांगले उदाहरण प्रस्तुत केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
    निस्वार्थ भावनेने वाचकांनी केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश पडला आहे. परमेश्वराला आपण पाहू शकत नाही तसेच ज्या वाचक – दात्यांनी आपले नाव प्रकाशात येऊ न देता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली ते देवरुपच आहेत असे सांगत राज्यपालांनी सर्व वाचक-दात्यांचे कौतुक केले.

    मुस्कानच्या हुंदक्याने राजभवन हेलावले
    आपली आई लोकांकडे घरकाम करून आपल्याला शिकवत आहे. वाचकांच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतीतून आपण शिक्षण घेऊन स्वावलंबी होऊ आणि आईला घरकाम करू देणार नाही, असे सांगताना मुस्कान शेख या मुलीच्या भावनेचा बांध फुटला. मुस्कानच्या हुंदक्यामुळे राज्यपालांसह सर्व उपस्थितांना गहिवरून आले.
    करोना काळात गरीब गरजू विद्यार्थ्यांसह ज्यांचे मातृछत्र, पितृछत्र हरवले आहे अश्या विद्यार्थ्यांना निवडले गेले. यावर्षी राज्यातून ४५ विद्यार्थी निवडले व त्यांना २.७५ कोटी रुपये इतकी मदत झाली. गेल्या १४ वर्षांत मटा हेल्पलाईनच्या माध्यमातून ४८३ विद्यार्थ्यांना २५ कोटी रुपयांची मदत झाली. हे विद्यार्थी नागरी सेवेसह अनेक क्षेत्रात योगदान देत आहेत, असे मटाचे संपादक पराग करंदीकर यांनी सांगितले. आज मदत घेणारे हात उद्या मदत देणारे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    विनायक राणे यांनी सूत्रसंचलन केले तर निवासी संपादक श्रीकांत बोजेवार यांनी आभारप्रदर्शन केले.