बंद

    24.09.2020: “नव्या शैक्षणिक धोरणाने संस्कार, संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व अधोरेखित केले” : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: September 24, 2020

    “नव्या शैक्षणिक धोरणाने संस्कार, संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व अधोरेखित केले” : राज्यपाल

    देश स्वतंत्र झाल्यापासून शैक्षणिक धोरणांमध्ये अनेकदा नवनव्या संकल्पना राबविल्या गेल्या. मात्र एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये भारतीयतेचा अभाव होता. समग्र असलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भारतीय नितीशास्त्रावर भर देताना संस्कार, संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व अधोरेखित केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    नैतिक मूल्ये हा शिक्षणाचा मूलाधार असतो. मात्र सर्वधर्म समभावाच्या नावाखाली नैतिक मूल्ये (ethics), आचार विचार (moral values) व चारित्र्य निर्माण या गोष्टी शिक्षणातून हद्दपार झाल्या. ही उणीव दूर करत नव्या शैक्षणिक धोरणाने माता, मातृभाषा व मातृभूमी या विषयांवर भर दिला आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षण केवळ रोजगार मिळवून देणारे नसावे तर चारित्र्यवान नागरिक घडविणारे असावे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    देशातील जुन्या व प्रतिष्ठेच्या पंजाब विद्यापीठाने गुरुवारी (दि. २४) आयोजित केलेल्या नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : अंमलबजावणीसाठी रोडमॅप’ या विषयावरील चर्चासत्राचे राजभवन मुंबई येथून उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते.

    भारताने जगाला आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: हा वेदविचार दिला. मात्र भारतात विदेशी शिक्षण संस्थांना मजाव होता. नव्या धोरणामुळे जगभरातील उत्तमोत्तम विद्यापीठे भारतात केंद्र सुरू करू शकतील असे त्यांनी सांगितले.

    अंत:विषय तसेच बहुशाखात्मक शिक्षणाला महत्व देणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवसंकल्पनाचे उष्मायन (incubation), नवोन्मेष (innovation), संशोधन व गहन विचार (critical thinking) यांना चालना देणारे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय व्हावा तसेच विविध तज्ञ समितींच्या माध्यमातून धोरणाचे सूक्ष्म अध्ययन व्हावे अशी सूचना आपण राष्ट्रपतींनी या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात सहभागी होताना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

    पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू राज कुमार यांनी प्रास्ताविक केले तर विद्यापीठ उपयोजित व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख उपासना जोशी-सेठी यांनी चर्चासत्राबाबत माहिती दिली.

    **