बंद

    24.08.2024: सनदी लेखापालांनी भारताच्या ‘बिग – फोर’ कंपनी निर्माण कराव्या : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: August 25, 2024
    Governor presides over the valedictory session of the 38th Western India Regional Conference of The Institute of Chartered Accountants of India

    सनदी लेखापालांनी भारताच्या ‘बिग – फोर’ कंपनी निर्माण कराव्या : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    आयसीएआय निर्माण करणार पंचायत – पालिका लेखापाल

    विकसित भारताचे उद्दिष्ट साकारण्यासाठी तसेच भारताला तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी सातत्यपूर्ण व सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे. हे उद्दिष्ट गाठताना जनसामान्यांपेक्षा सनदी लोकपालांना अनेक पटींनी अधिक योगदान द्यावे लागेल असे सांगताना सनदी लेखापालांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेखा परीक्षण व कर सल्लागार कंपन्या निर्माण कराव्या, असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले.

    इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया सनदी लेखापालांच्या राष्ट्रीय संस्थेच्या पश्चिम क्षेत्रीय विभागातर्फे आयोजित ३८ व्या क्षेत्रीय परिषदेचा समारोप शनिवारी (दि. २४) राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    सनदी लेखापाल हे शासन आणि उद्योग जगतातील दुवा असून अंबानी, अदाणी यांचेपासून लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांसह जनसामान्यांना योग्य तो सल्ला देण्याचे कार्य करीत असतात. कोणतीही कंपनी ‘सत्यम’च्या वाटेने जाऊ नये या करिता काय योग्य आहे काय अयोग्य आहे तसेच पूर्वी झालेल्या चुका कश्या प्रकाराने टाळता येऊ शकतात याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

    ‘सशक्त सनदी लेखापाल, विकसित भारत’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अभिनंदन करून सनदी लेखापालांनी राष्ट्रनिर्माण कार्यात तसेच समृद्ध भारताच्या निर्मितीत भागीदार व्हावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

    आयसीएआय घडवणार पंचायत / पालिका लेखापाल : अंकीत राठी* / *पंचायत लेखापालांना मिळणार ४०००० वेतन

    आयसीएआय ही संस्था पंचायती व महापालिकांमध्ये आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने कार्य करीत असून नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या सहकार्याने संस्थेने पंचायत तसेच पालिकांमध्ये लेखापाल निर्माण करणार असल्याची माहिती आयसीएआयचे पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अंकीत राठी यांनी यावेळी दिली. या दृष्टीने आयसीएआयने बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ महिन्यांचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    पंचायत / पालिका लेखापालांना अंदाजे चाळीस हजार रुपये वेतन मिळेल असे त्यांनी सांगितले. अश्या प्रकारे आयसीएआय कौशल्य विकास करून युवकांना रोजगार सक्षम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

    देशातील केवळ २७ टक्के लोक आर्थिक दृष्ट्या साक्षर असून आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी आयसीएआय संस्था १२ भारतीय भाषांमधून जनतेचे वित्त व लेखा विषयांवर प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    समारोप सत्राला सनदी लेखापाल रणजीत कुमार अग्रवाल, अध्यक्ष, आयसीएआय, राहुल पारीख, उपाध्यक्ष,पश्चिम क्षेत्र, गौतम लथ, सचिव तसेच पश्चिम क्षेत्रातील सनदी लेखापाल उपस्थित होते.