24.08.2023: मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान अनमोल : राज्यपाल
एचएसएनसी शैक्षणिक संस्थेचे ७५ व्या वर्षात पदार्पण
मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान अनमोल : राज्यपाल रमेश बैस
स्वातंत्र्यानंतर मुंबईत स्थलांतर केल्यानंतर सिंधी समाजातील लोकांनी अनेक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था स्थापन करून मुंबईच्या शैक्षणिक विकासात अनमोल योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. सिंधी समाजातील लोकांनी स्थापन केलेल्या एचएसएनसी शिक्षण संस्थेने पुढील २५ वर्षांसाठी आपल्या विकासाचा रोडमॅप तयार करून देशविदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
मुंबईतील ३० महाविद्यालये व शाळांचे संचलन करणाऱ्या हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) बोर्ड या सिंधी अल्पसंख्यांक संस्थेच्या स्थापनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
सर्वसाधारणपणे एखादे झाड मुळापासून उखडले तर ते नव्या ठिकाणी मूळ धरतेच असे नाही. परंतु सिंधी समाजाने फाळणीनंतर विस्थापित झाल्यानंतर मुंबईत येऊन निर्धार, मेहनत व प्रामाणिकपणाने प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवले. एचएसएनसी शिक्षण मंडळ या दृढ निर्धाराचे जिवंत उदाहरण आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
एचएसएनसी संस्थेचे संस्थापक एच.जी. अडवाणी व ‘विद्यासागर’ के एम कुंदनानी यांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे मुंबईतील महाविद्यालये देशातील सर्वोत्तम महाविद्यालयांच्या यादीमध्ये गणली जातात, असे राज्यपालांनी सांगितले. आगामी काळात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञा व मशीन लर्निंग तंत्रज्ञानामुळे अभूतपूर्व बदल येऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांनी कृत्रिम प्रज्ञेच्या अनुरुप अभ्यासक्रम आखावे, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यात सर्वाधिक विदेशी विद्यार्थी पुणे येथे शिक्षणासाठी येतात याकडे लक्ष वेधून एचएसएनसी समूहातील महाविद्यालयांनी उत्कृष्ट अध्यापक नेमून, चांगले अभ्यासक्रम राबवून तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुरूप अभ्यासक्रमात बदल करून मुंबईला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पसंतीचे केंद्र बनवावे असे आवाहन राज्यपालांनी केले.
सन १९४९ साली वांद्रे येथील नॅशनल कॉलेजपासून सुरुवात करून आज एचएसएनसी ही संस्था ३० महाविद्यालयांचे संचालन करीत असून संस्थेत ५०,००० विद्यार्थी शिकत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल हरीश यांनी यावेळी दिली. संस्था अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निवासी शैक्षणिक संकुल विकसित करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते बोर्डाच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे माजी अध्यक्ष किशू मनसुखानी व विश्वस्त माया शहानी तसेच ओएसडी पदमा शाह यांचा संस्थेतील गौरवपूर्ण सेवेबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ निरंजन हिरानंदानी व सचिव दिनेश पंजवानी यांची देखील समयोचित भाषणे झाली. एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजन वेळूकर, माजी प्रकुलगुरु डॉ नरेश चंद्र, इगनूचे माजी कुलगुरु डॉ राजशेखरन पिल्लई, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच निमंत्रित उपस्थित होते.