बंद

    24.07.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत १६५ वा आयकर दिवस साजरा

    प्रकाशित तारीख: July 24, 2024
    Governor presides over the 165th Income Tax Day celebrations organised by the Income Tax Department Mumbai

    प्रत्येक करदाता हा राष्ट्रनिर्माता
    राज्यपालांच्या उपस्थितीत १६५ वा आयकर दिवस साजरा
    राष्ट्र विकासासाठी योगदान या सकारात्मक भावनेने कर भरावा : राज्यपाल रमेश बैस

    जनतेला सरकारकडून आरोग्य, शिक्षण, रस्ते, पायाभूत विकास आदी सुविधा अपेक्षित असतात. लोकांनी दिलेल्या करांच्या माध्यमातूनच सरकार या सुविधा पुरवत असते. मात्र अनेकदा कर भरताना लोक नाखूष असतात. आपण भरत असलेला कर हे राष्ट्र विकासासाठी आपले योगदान आहे या सकारात्मक भावनेने नागरिकांनी कर भरला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. २४ जुलै) मुंबई क्षेत्राच्या आयकर विभागातर्फे आयोजित १६५ वा ‘आयकर दिवस’ कौटिल्य भवन, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाला मुंबई विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त राज टंडन, आयकर विभागाच्या नॅशनल फेसलेस असेसमेंट सेंटरच्या प्रधान मुख्य आयुक्त जहानजेब अख्तर, एडेल्वाइज म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालिका राधिका गुप्ता, आयकर विभागाचे अधिकारी तसेच व्यापार – उद्योग संस्थांचे प्रतिनिधी व करदाते उपस्थित होते.

    कोरोना महामारी, युक्रेन युद्ध आदी संकटाच्या पार्श्वभूमीवर देखील भारतीय अर्थव्यवस्था आज जोमाने वाढत आहे असे नमूद करून देशाला परकीय गुंतवणूकीसाठी आकर्षक स्थान बनवून जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात कर प्रशासनाची भूमिका महत्वाची असेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    गेल्या दशकात सरकारने कर भरण्याची व दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ व फेसलेस केली असून करदात्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगून करासंदर्भात विवाद सोडविण्याबाबत देखील सरकारने अनेक उपाययोजना केल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    देशातील एकूण १९.५८ लाख कोटी आयकर गंगाजळीपैकी एकट्या मुंबईचे योगदान एक तृतीयांश किंवा ६.५६ लाख कोटी रुपये इतके भरीव असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    कर भरणे हा उत्तम नागरिक होण्याकरिता संस्कार म्हणून मुलांमध्ये रुजवला पाहिजे असे सांगून कर साक्षरता वाढविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन टॅक्स रिटर्न दाखल करण्याबाबत वर्षातून किमान एकदा मार्गदर्शन सत्र ठेवले पाहिजे अशी सूचना राज्यपालांनी केली.

    देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची आर्थिक स्थिती बिकट होती. आज देशाने कृषी, उद्योग, अवकाश तंत्रज्ञान यांसह अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली असून देश महासत्ता म्हणून उदयास आला आहे. राष्ट्र निर्मात्यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यात आयकर विभागाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रधान मुख्य आयकर आयुक्त राज टंडन यांनी यावेळी केले. करदात्यांचे अभिनंदन करताना प्रत्येक करदाता हा राष्ट्रनिर्माता असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी मॅक्स हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. अभय सोई, ट्रायओकेम प्रोडक्ट्स लिमिटेडचे सीईओ रामू सीताराम देवरा आणि जेएपी इंजिनिअरिंगचे एमडी सुनील पॉल निलायटिंगल यांचा श्रेष्ठ करदाते म्हणून सत्कार करण्यात आला.

    आयकर विभागाचे मुख्य आयुक्त विनय सिन्हा यांनी प्रास्ताविक केले तर अतिरिक्त मुख्य आयकर आयुक्त (प्रशा.) डॉ सौरभ देशपांडे यांनी आभार मानले.