24.06.2023 : राज्यपाल रमेश बैस यांची सेवाग्राम आश्रमास भेट
राज्यपाल रमेश बैस यांची सेवाग्राम आश्रमास भेट
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन
वर्धा, दि.24 (जिमाका) : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमास भेट दिली. बापु कुटीसह आश्रम परिसराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. गांधीजींनी देशाला जोडण्याचे काम केले. त्यांना नमन करण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी भेटी नंतर संवाद साधतांना सांगितले.
आश्रमात आगमण झाल्यानंतर सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, आश्रम प्रतिष्ठानचे नामदेव ढोले यांनी चरखा भेट देऊन राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आदी निवास, कस्तुरबा गांधी वास्तव्यास असलेले ‘बा’ कुटी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेले बापु कुटी, गांधीजींचे तत्कालीन कार्यालय आदींना भेटी देऊन पाहणी केली.
आश्रम प्रतिष्ठानच्या अश्विनी बघेल यांनी राज्यपालांना आश्रम व तेथील ऐतिहासिक महत्वाची माहिती दिली. ‘बा’ व बापुंचे निवासस्थान, प्रार्थनास्थळ, बापुंनी आपल्या हाताने लावलेल्या वृक्षांची माहिती देण्यात आली. आश्रमाची पाहणी केल्यानंतर राज्यपालांनी आश्रमातील नोंदवहीत अभिप्राय नोंदविला. यावेळी खा.रामदास तडस, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते.
तत्पूर्वी राज्यपालांचे विश्राम भवन येथे आगमण झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी त्यांचे चरखा, शाल, सुतमाळा भेट देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो.रजनीशकुमार शुक्ल, खा.रामदास तडस, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन उपस्थित होते.