बंद

    23.06.2021 : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संकल्पनेतील स्वर्णिम भारत साकारणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: June 23, 2021

    डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संकल्पनेतील स्वर्णिम भारत साकारणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल : राज्यपाल

    ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सन्मान प्रदान

    डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणांचे बलिदान दिले. आपल्या सिद्धान्तांसाठी त्यांनी केंद्रीय मंत्रिपद सोडले. मुखर्जी यांचे काश्मीरचे स्वप्न साकार झाले असले तरीही आज देश लडाख, अरुणाचल प्रदेश अश्या अनेक आघाड्यांवर संकटांना तोंड देत आहे. अश्यावेळी संपूर्ण देशाने एक होऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संकल्पनेतील स्वर्णिम भारत साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त बुधवारी (दि. २३ जून) राजभवन येथे आ‍योजित एका कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना ‘डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान’ प्रदान करण्यात आला.

    श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ असे निक्षून सांगितले होते याचे स्मरण देऊन मुखर्जी यांचे काश्मीरबाबतचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी सन २०१९ साली कलम ३७० रद्द करून साकार करून दाखवले असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    प्रवाहाविरुद्ध पोहणारे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्काराचे योग्य मानकरी असल्याचे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड व दीप-कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरजित मिश्र उपस्थित होते. दीप-कमल फाऊंडेशन तर्फे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. भाऊ तोरसेकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.