बंद

    22.12.2024 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

    प्रकाशित तारीख: December 22, 2024
    22.12.2024 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

    राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

    विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे – राज्यपालांचा विद्यार्थ्यांना सल्ला

    मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे, असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

    सायन येथील षन्मुखानंद सभागृहात आयोजित या सोहळ्यात सेवानिवृत्त मेजर जनरल नितीन गडकरी, शारदाश्रम विद्यालय शाळा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजन गुप्ते, चेअरमन पी. बी. देसाई, सचिव गजेंद्र शेट्टी यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या प्रवासातील ७५ वर्षे हा मोठा टप्पा असतो. शारदाश्रम शाळेने या कालावधीत कौतुकास्पद काम केले आहे. दिलीप प्रभावळकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह या शाळेत शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरीद्वारे शाळेचे नाव उंचावले आहे. या माजी विद्यार्थ्यांचा प्रवास प्रेरणादायी असून शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामाप्रमाणे आपल्या अभ्यासात एकाग्रतेची आणि कठोर परिश्रम करण्याची सवय अंगिकारावी, यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची भूमी आहे. शिवाजी महाराजांच्या आठवणी सांगून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अशा व्यक्तींच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवावी तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळांमध्ये अवश्य सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    श्री.गडकरी यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना सेवादलाच्या माध्यमातून देशसेवेसाठी पुढे येण्यासाठी प्रेरणा दिली. तर संस्थेचे सचिव श्री.शेट्टी यांनी शारदाश्रमच्या वाटचालीबाबतची माहिती दिली.

    शाळेतील दहावीच्या परीक्षेत तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या अम्ब्रोसिया या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. शाळेच्या लहान विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही राज्यपालांनी कौतुक केले.