21.08.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न
राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न
स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत होईल : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
गेल्या दहा वर्षात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची महासत्ता झाला असून २०३० पर्यंत तिसरी मोठी महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार केल्या जात असून स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत व सर्वसमावेशक होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २१) मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ‘उद्योजकता प्रोत्साहन’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन, मुंबई व स्वदेशी जागरण मंच, कोकण यांच्या वतीने करण्यात आले.
स्वदेशी संकल्पनेचा पुरस्कार लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या नेत्यांनी केल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीला चळवळीचे रूप आले. आज उत्पादन व सेवा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. उत्पादनासह देश तंत्रज्ञानात देखील आत्मनिर्भर होत आहे. मात्र, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्युच्च गुणवत्ता व स्पर्धात्मक मूल्य ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत आज अनेक क्षेत्रात निर्यातदार झाला आहे असे सांगून सर्वांनी सशक्त भारत निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजक डॉ. दिव्या राठोड व निकुंज मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यपालांच्या हस्ते ‘३७ कोटी स्टार्ट अप्सचा देश’ आणि ‘मंदिर अर्थशास्त्र’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय सह-संयोजक अजय पत्की, रा.स्व. संघाचे मुंबई विभाग संघचालक रवींद्र संघवी, आंतरराष्ट्रीय वैश फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप माहेश्वरी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.