बंद

    22.08.2022 : सेवालय संस्थेला राज्यपालांकडून दहा लाख रुपयांची देणगी

    प्रकाशित तारीख: August 22, 2022

    एचआयव्ही बाधित मुलांच्या सादरीकरणाने राज्यपाल भारावले

    अनुराधा पौडवाल यांच्या सामाजिक कार्याचे राज्यपालांकडून कौतुक

    सेवालय संस्थेला राज्यपालांकडून दहा लाख रुपयांची देणगी

    ईश्वराने दिन – दु:खी व उपेक्षित लोकांची सेवा करण्याची क्षमता केवळ मनुष्याला दिली आहे. निराश्रित व्यक्तीची सेवा करून तिला सन्मानाने जीवन जगण्यास मदत करण्याचा विशेषाधिकार मनुष्याला मिळाला आहे. त्याचा वापर करून प्रत्येकाने किमान एका गरजु व्यक्तीला तरी जीवनात मदत केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. या दृष्टीने एचआयव्ही बाधित मुलांसाठी पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपालांनी काढले.

    औसा, लातूर येथील ‘सेवालय बालगृह’ या संस्थेने एचआयव्ही बाधित मुलांसाठी बांधलेल्या वसतिगृह इमारतीच्या कोनशिलेचे प्रातिनिधिक अनावरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाला पार्श्वगायिका तसेच सुर्योदय फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा पौडवाल, एम्पथी फाउंडेशनचे विश्वस्त रमेश दमाणी व प्रवीण छेडा, ‘सेवालय’चे संस्थापक रवी बापुटले यांसह सेवालय संस्थेतील निवासी एचआयव्ही बाधित मुले उपस्थित होते.

    सेवालय संस्थेच्या ‘हॅपी इंडियन व्हिलेज’ (एचआयव्ही) या उपक्रमाचे कौतुक करून राज्यपालांनी संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

    यावेळी एचआयव्ही बाधित मुलांनी सादर केलेले सीमेवरील जवानांचा जीवनपट दाखविणारे लघुनाट्य पाहून राज्यपालांसह सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले.

    सूर्योदय फाउंडेशन तसेच एम्पथी फाउंडेशन या संस्थांच्या आर्थिक सहकार्याने सेवालय बालगृहाच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

    यावेळी कविता पौडवाल यांनी सूर्योदय फाउंडेशन तसेच सुगल व दमाणी उद्योग समूहाच्या एम्पथी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.