बंद

    22.02.2025: उपराष्ट्रपतींनी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 व्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित

    प्रकाशित तारीख: February 22, 2025
    22.02.2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

    उपराष्ट्रपती कार्यालय

    उपराष्ट्रपतींनी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 व्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित

    उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज अवैध स्थलांतरितांच्या समस्येबाबत अतिशय गांभीर्याने चिंता व्यक्त केली. आपल्या भारतात असे लक्षावधी लोक राहात आहेत ज्यांना येथे राहण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. ते येथे केवळ राहातच नाहीत तर येथील उपजीविकेच्या व्यवहारांमध्येही त्यांचा सहभाग आहे. आपल्या साधनसंपत्तीवर – शिक्षण, आरोग्य आणि गृहनिर्माण क्षेत्रावर अधिकार सांगत ते त्यांची उपजीविका करत आहेत आणि ही समस्या आता आणखी गंभीर झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या निवडणूक प्रक्रियेत, आपल्या लोकशाही प्रणालीत त्यांचा हस्तक्षेप होत आहे आणि ते यामध्ये महत्त्वाचे आणि अगदी निर्णायक घटक बनू लागले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

    छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना, डॉ. धनखड यांनी, भुरळ घालून आणि आमिष दाखवून होत असलेल्या धर्मांतराबाबत सावधगिरीचा इशारा दिला. प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला आपल्या पसंतीचा धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रलोभन, हाव, भुरळ, आमिषे यांच्या माध्यमातून जेव्हा धर्मांतर होते आणि या देशाचे लोकसंख्येचे स्वरुप बदलून आम्ही वर्चस्व प्रस्थापित करू हा त्याचा उद्देश असेल, तर अऩेक शतके जुन्या आपल्या तत्वज्ञानाला हा एक गंभीर धोका आहे, यावर त्यांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या पसंतीच्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार असल्याची पुष्टी करत भर दिला.

    राष्ट्रीय संस्थांचे महत्त्व कमी करण्याच्या नियोजनबद्ध प्रयत्नांबद्दलही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली आणि अलीकडेच उघड झालेल्या निवडणूक प्रक्रियेत फेरफार करण्याच्या प्रयत्नांची सखोल चौकशी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

    राज्यघटनेने हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांबद्दल बोलताना उपराष्ट्रपतींनी असे नमूद केले की आपली मूलभूत आणि नागरी कर्तव्ये प्रामाणिकपणाने पार पाडूनच हे अधिकार मिळवले पाहिजेत.
    सार्वजनिक व्यवस्थेसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आणि नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचे आवाहन केले. सामाजिक परिवर्तनाच्या महत्त्वावर भर देत धनखड यांनी सांगितले की आपण सामाजिक सौहार्द निर्माण केल्यावर सामाजिक परिवर्तन घडून येईल. यामुळे आपल्या जाती, धर्म, पंथ, विभाजनवादी परिस्थिती यांचे रुपांतर एकतेच्या बळामध्ये होईल. कोणत्याही परिस्थितीत आपण सर्वांनी सामाजिक सौहार्द निर्माण करु या, आपल्या कौटुंबिक मूल्यांचे पालन करु या, वरिष्ठांचा, आपल्या पालकांचा, आपल्या शेजाऱ्यांचा, आपल्या शेजारधर्माचा आदर करु या. आपण एक सर्वस्वी वेगळी सभ्यता आहोत, असे ते म्हणाले.

    हवामान बदलाच्या समस्येबाबतही उपराष्ट्रपतींनी गंभीर चिंता व्यक्त केली आणि पंतप्रधानांनी दिलेल्या ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत योगदान देऊन देशाला बळकट करण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय फुलारी आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.