21.12.2021: महाविद्यालयातील शिक्षकांनी आपले स्वयं मूल्यांकन करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चर्चासत्राचे आयोजन
महाविद्यालयातील शिक्षकांनी आपले स्वयं मूल्यांकन करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून अध्ययन केवळ विद्यार्थ्यांनीच करावे असे नसून शिक्षकांनी देखील सातत्याने अध्ययन करून अद्ययावत राहिले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन देखील केले पाहिजे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकास साधल्या जाईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
कांदिवली मुंबई येथील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवारी (दि. २१) ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते.
कार्यक्रमाला ठाकूर महाविद्यालयाचे सचिव जितेंद्र सिंह ठाकूर, कोषाध्यक्ष राजकुमार सिंह, विश्वस्त रमेश सिंह, प्राचार्या डॉ चैताली चक्रवर्ती, उपप्राचार्य निशिकांत झा, विशेष निमंत्रक प्राचार्या डॉ शोभना वासुदेवन व डॉ ए एम पुराणिक, तसेच प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षणाशी निगडित सर्व गटांशी व्यापक विचार विमर्श करून तयार करण्यात आले असून या धोरणात विद्यार्थ्यांना सुरुवातीची काही वर्षे मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे, असे सांगताना जपान किंवा चीन या देशात आरंभीचे शिक्षण मातृभाषेतच दिले जाते याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले.
साक्षर शब्दाला उलट करून वाचले तर राक्षस शब्द होतो. अनेकदा उच्च शिक्षित लोक समाज विघातक कृत्यांमध्ये सहभागी होताना आपण पाहतो, असे नमूद करून शिक्षणाला संस्कार व नीती मूल्यांची जोड देऊन चारित्र्यसंपन्न समाज घडवणे नव्या शैक्षणिक धोरणाला अभिप्रेत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
आंतरशाखीय अध्ययनास चालना, ‘नो डिटेंशन पॉलिसी’, अकॅडेमिक क्रेडिट्स व उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० टक्के इतके वाढवणे ही शैक्षणिक धोरणाची वैशिष्टये असल्याचे सांगून, विद्यापीठे व महाविद्यालये यांनी चांगल्या परदेशी विद्यापीठांसोबत गुणवत्ता वृद्धीसाठी सहकार्य वाढवावे, असेही राज्यपालांनी सांगितले.
प्राचार्या डॉ चैताली चक्रवर्ती यांनी स्थापनेपासून २५ वर्षांत महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या ५७ वरून १५००० इतकी झाल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संयोजक डॉ संतोष सिंह यांनी चर्चासत्राची भूमिका विशद केली.