बंद

    21.08.2021 डेल्फिक कौन्सिलच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण संपन्न

    प्रकाशित तारीख: August 21, 2021

    डेल्फिक कौन्सिलच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण संपन्न

    डेल्फिक कौन्सिलने महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जतन करावा: राज्यपाल

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डेल्फिक कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या बोधचिन्हाचे (लोगो) शनिवारी (दि. २१) राजभवन येथे अनावरण केले. कौन्सिलच्या माध्यमातून राज्यात कलाकार, सांस्कृतिक संघटना व समूहांना दृकश्राव्य कला व साहित्य कला सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

    महाराष्ट्र ही कला, नृत्य, वादनकला व संस्कृतीची खाण असून डेल्फिक कौन्सिलच्या राज्य शाखेच्या माध्यमातून राज्याच्या कला, आदिवासी कला, संस्कृती व सिनेमाला चालना मिळेल. कौन्सिलने राज्याचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले.

    कार्यक्रमाला खासदार हेमा मालिनी, नेशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष अभिनेते परेश रावल व डेल्फिक कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष व भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी साहिल सेठ प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य डेल्फिक कौन्सिलचे सदस्य अभी मित्तल, सुरेश थोमस, सिने निर्माते अली अकबर सुलतान अहमद व चित्रपट क्षेत्रातील अनेक लोक यावेळी उपस्थित होते.

    आंतरराष्ट्रीय डेल्फिक कौन्सिल ही एक जागतिक स्वयंसेवी संघटना असून कला व संस्कृतीच्या माध्यमातून जगभरात सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी काम करीत आहे.

    डेल्फिक कौन्सिलच्या वतीने विविध कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या डेल्फिक गेम्सचे आयोजन करण्यात येते. डेल्फिक गेम्सची सुरुवात ग्रीस देशातील डेल्फिक येथे ऑलिम्पिकचे जुळे भावंड म्हणून २५०० वर्षांपूर्वी झाली.

    ऑलिम्पिकमध्ये जसा क्रीडा प्रकारांचा समावेश होतो तसा डेल्फिक गेम्समध्ये कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो. भारतात २२ राज्यात डेल्फिक कौन्सिल्सची स्थापना करण्यात आली असल्याचे साहिल सेठ यांनी सांगितले.