21.06.2023 : राजभवन येथे श्रीमद राजचंद्र मिशनच्या वतीने योगसत्राचे आयोजन
राजभवन येथे श्रीमद राजचंद्र मिशनच्या वतीने योगसत्राचे आयोजन
भारताने जगाला उत्कृष्ठ योगप्रशिक्षक द्यावे : राज्यपाल रमेश बैस
योग ही भारताची जगाला भेट असून या वारस्याचे जतन करण्याची तसेच जगात योगाचा प्रचार व प्रसार करण्याची सामूहिक जबाबदारी भारतीयांवर आहे, असे सांगून भावी पिढ्यांना योग शिकविण्यासाठी भारताने जगाला उत्कृष्ठ योग प्रशिक्षक द्यावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. या दृष्टीने श्रीमद राजचंद्र मिशन सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. २१) राजभवन येथे एका योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
‘श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर’ या संस्थेच्या योग विभागाच्या सहकार्याने राजभवन येथील आयोजित योगसत्रामध्ये राजभवनातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
योग केवळ शारीरिक आरोग्यासाठी करावयाची आसने नसून योग परमात्म्याशी जोडण्याची क्रिया आहे असे राज्यपालांनी सांगितले. तणावमुक्ती मिळविण्यासाठी आणि जीवन शैलीशी निगडित आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग उपयुक्त सिद्ध होऊ शकतो, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. युवाशक्तीच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी तसेच स्वस्थ भारताचे उद्दिष्ट प्राप्त करण्यास योग सहाय्यभूत ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाला श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरचे सचिव आत्मप्रीत मौलिकजी, विश्वस्त रमण टिक्का, श्रीमद राजचंद्र मिशन जीवदया ट्रस्टचे विश्वस्त रतन लुणावत, विश्वस्त पीयूष शहा व किरीट दोशी तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.