21.02.2024: सोलापूर विद्यापीठाने जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा ‘रेशो’ वाढविला: राज्यपाल श्री बैस
सोलापूर विद्यापीठाने जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा ‘रेशो’ वाढविला: राज्यपाल श्री बैस
सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात!
सोलापूर, दि. 21- संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा सोलापूरच्या हुतात्मा नगरीत निर्माण झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने गेल्या दोन दशकात सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा ‘रेशो’ वाढवण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण योगदान दिल्याचा गौरवोद्गगार महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री रमेश बैस यांनी काढले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणिसावा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन पद्धतीने महामहीम राज्यपाल तथा कुलपती श्री रमेश बैस हे जोडले होते. यावेळी ते बोलत होते. दीक्षांत मंडपात पार पडलेल्या प्रत्यक्ष समारंभास प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात निवृत्त प्राध्यापक तथा पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदींची उपस्थिती होती.
राज्यपाल श्री बैस म्हणाले की, सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी आहे. बहुभाषिक शहर असलेल्या या नगरीने मोठे समाजसेवक, कलावंत, राजकारणी, उद्योजक घडविले. सोलापूरचे सुपुत्र असलेले दिवंगत डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये आरोग्य सेवा देऊन देशाची मान उंचावली. अशा या शहरातील विद्यापीठातून आज विद्यार्थ्यांनी विविध पदव्या संपादन केल्या, याचा मला आनंद होत आहे. आता विद्यार्थ्यांनी समाज व देशासाठी काम करुन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत संकल्प केलेल्या विकसित भारतासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याचबरोबर वस्त्रोद्योगाची नगरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूरचे नाव जागतिक पातळीवर नेण्यासाठी विद्यापीठाने वस्त्रोद्योगाचे स्किल कोर्सेस सुरू करावेत आणि यासाठी शासनाच्या स्किल संस्थासोबत सामंजस्य करार करण्याचे आवाहनही राज्यपाल श्री बैस यांनी केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाच्या विकासासाठी निश्चितच चांगले योगदान देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पद्मविभूषण प्रा. शर्मा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा. विद्यापीठ लहान असूनही आज 46 संशोधकांनी विविध विषयांमध्ये संशोधन केले, ही चांगली गोष्ट आहे. बेसिक सायन्समध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, जे समाजाला उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांनी आपले अभ्यासाचे वर्ग कधी चुकवू नये. शिक्षकांनी चांगले शिक्षण देणे आणि संशोधनावर भर देणे महत्त्वाचे आहे. मानव उपयोगी संशोधन उदा. मोबाईल, कोव्हिड वॅक्सिन असे समाज उपयोगी संशोधन करावे. शिक्षक म्हणून ज्ञानयोगी आणि कर्मयोगी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे, ती जपावी. महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी संघटना मजबूत करणे आवश्यक आहे, असे ही ते म्हणाले.
कुलगुरू प्रा. महानवर यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करून विद्यापीठाने गतवर्षात शिक्षण, संशोधन, कला, क्रीडा, कौशल्य विकास आणि उद्योजकता निर्मिती या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले. आगामी वर्षात देखील सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक असे ज्ञानदानाचे कार्य करत यशाची नवे शिखरे विद्यापीठ नक्कीच गाठेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या समारंभात एकूण 9 हजार 943 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले. याचबरोबर 46 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघाली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले.