बंद

    20.08.2024: राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ आंबेडकर स्मारकाची पाहणी

    प्रकाशित तारीख: August 20, 2024
    Maharashtra Governor reviews progress of Dr Ambedkar Memorial at Indu Mill Compound

    राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ आंबेडकर स्मारकाची पाहणी

    राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सह मंगळवारी (दि. २०) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी केली.

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर राष्ट्रवादी नेते होते. त्यांनी समानतेसाठी आपले जीवन वेचले. डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक ही त्यांना यथोचित आदरांजली असून या स्मारकामुळे देश विदेशातील लोकांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची महती कळेल, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले. डॉ. आंबेडकर यांच्या भव्य स्मारकामुळे भारतीय समाज अधिक सशक्त व एकसंध होण्यास मदत होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

    मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे करण्यात आलेल्या सादरीकरणाचे वेळी राज्यपालांनी स्मारकाच्या निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्मारकामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी करण्यात येत असलेल्या सोयी – सुविधा तसेच स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

    इंदू मिल येथील भव्य स्मारक हा संपूर्ण हरित परिसर असेल तसेच तेथे ७५० ते ८०० मोठी झाडे लावण्यात येणार आहे. या ठिकाणी १००० व्यक्तींची आसन क्षमता असलेले भव्य सभागृह, चवदार तळ्याचे प्रतिरूप तळे तसेच ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

    यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, भंते डॉ. राहुल बोधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे व विजय वाघमारे, वास्तशिल्पकार शशी प्रभू , मूर्ती शिल्पकार अनिल सुतार आदी उपस्थित होते.