बंद

    20.07.2021 : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कारांचे पार पडले वितरण

    प्रकाशित तारीख: July 20, 2021

    पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपली लेखणीची धार अधिक तीव्र करावी

    :- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

    · मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कारांचे पार पडले वितरण

    · 2020 सालचा कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी सन्मानित

    मुंबई, दि. २०: – पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपली लेखणीची धार थोडी अधिक तीव्र करावी,पत्रकार हा आपल्या विचारांनी समाज घडवत असतो.समाजात ज्या ठिकाणी अनुचीत प्रकार घडत आहेत ते उलगडण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले.

    मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणारा २०२० चा जीवनगौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण राजभवन येथे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,पर्यटन व राज्यशिष्टाचार राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे,ज्येष्ठ पत्रकार तथा माजी खासदार भारतकुमार राऊत,यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, कार्यवाह प्रमोद डोईफोडे,नेहा पुरव इतर कार्यकारिणी सदस्य यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

    मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने २०२० सालचा कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना प्रदान करण्यात आला. तर राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार इंडिया टुडेचे किरण तारे, न्यूज १८ लोकमत औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांना तर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै.पुढारीचे चंदन शिरवाळे यांना प्रदान करण्यात आला.

    राज्यपाल यावेळी म्हणाले की,पत्रकारिता ही जोखीम असली तरी समाज घडविण्यासाठी ही जोखीम महत्वाची आहे.समाजातील चांगल्या गोष्टी ज्याप्रमाणे पुढे आल्या पाहिजेत तेवढेच वाईट देखील समोर आले पाहिजे.त्यामुळे पत्रकारांचा समग्र दृष्टीकोनातून पत्रकारिता केली तर ती समाजाला निश्चीतच मार्गदर्शक असेल.एक सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी अशी पत्रकारिता महत्वाची आहे.पुरस्कार विजेत्या पत्रकारांचे यावेळी राज्यपालांनी अभिनंदन केले.

    पत्रकारांसोबत संवाद वाढविण्यावर भर देणार : राज्यमंत्री आदिती तटकरे

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकारांसोबत संवाद वाढविण्यावर भर देवून, पत्रकारांसाठी आपण या विभागामार्फत ज्या काही योजना अथवा नव्याने सुचविण्यात येणारे उपक्रम प्राधान्याने राबविणार असल्याची ग्वाही माहिती व जनसंपर्क महांसचालनालयाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.सर्व पुरस्कार विजेत्या पत्रकारांचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले.लोकप्रतिनिधी म्हणून काही निर्णय घेताना आपण कुठे चुकत आहोत असे सुचविणा-या बातम्या देखील खुप महत्वाच्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांचा पत्रकार ते चित्रकार हा प्रवास थक्क करणारा : भारतकुमार राऊत

    ज्येष्ठ पत्रकार तथा माजी खासदार भारतकुमार राऊत म्हणाले,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा सदस्य ते आज कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून येणे हे निश्चीतच खुप आनंदाची गोष्ट आहे.त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी या माझ्या सहका-याला मिळत असलेला ‘जीवनगौरव पुरस्कार’ ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.एक पत्रकार ते चित्रकार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.श्री.जोशी यांच्याकडे पाहिल्यानंतर निश्चीतच एक गोष्ट लक्षात येते की पत्रकारांनी पत्रकारितेबरोबरच इतर आपल्याला आवडणा-या क्षेत्रातही लक्ष दिल्यास निश्चितच यश मिळू शकते.

    जीवनगौरव पुरस्कारामुळे भारावून गेलो :- प्रकाश बाळ जोशी

    ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी म्हणाले,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या पुरस्कारामुळे मी भारावून गेलो आहे. पत्रकारिता सोडून दहा वर्षे उलटून गेली आहेत,आज चित्रकार म्हणूनच माझी ओळख आहे.आमच्या वेळी पत्रकारितेची मर्यादीत साधने होती आज मात्र मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबत सोशल मिडीयाचाही प्रभाव वाढला आहे.आजच्या माध्यमांसमोर फेक न्यूज हे मोठे आव्हान आहे.आज सर्व पत्रकारांनी मी फेक न्यूज करणार नाही अशा प्रकारची शपथ घेण्याची वेळ आली असल्याचे मत ही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी व्यक्त केले.

    यावेळी पुरस्कार विजेत्या पत्रकारांची संपुर्ण माहिती असलेली ध्वनिचित्रफित यावेळी उपस्थितांसमोर दाखविण्यात आली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांनी केले.सुत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य मिलिंद लिमये यांनी केले.आभार कार्यकारिणी सदस्य महेश पावसकर यांनी मानले.

    संध्या गरवारे, मंत्रालय