बंद

  20.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते मराठी साहित्य संकेतस्थळाचे उदघाटन

  प्रकाशित तारीख: April 20, 2022

  राज्यपालांच्या हस्ते मराठी साहित्य संकेतस्थळाचे उदघाटन

  युवापिढी मातृभाषेपासून दूर जात असल्याबद्दल राज्यपालांनी व्यक्त केली खंत

  मातृभाषा रक्षणासाठी युवकांनी मिशन मोड वर काम करावे : राज्यपालांची सूचना

  देशातील युवापिढी भारतीय भाषांपासून दुरावत आहे, हे दुर्दैवी आहे. इंग्रजी भाषेला महत्व देताना श्रेष्ठ साहित्य असलेल्या भारतीय भाषांना आपण महत्व दिले नाही तर भाषाही मरतील व संस्कृतीही टिकणार नाही. मात्र मातृभाषा रक्षणाचे कार्य युवकांनी हाती घेतले व ते मिशन मोडवर राबवले तर भाषांना उज्वल भवितव्य लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

  पुणे येथील मराठी साहित्यप्रेमी युवकांनी सुरु केलेल्या मराठीसाहित्य.कॉम या संकेतस्थळाचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २०) राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.

  विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवश्य शिकावी, संस्कृत देखील शिकावी परंतु वापरात मराठी भाषा आणावी. मातृभाषा चांगली आली तर दुसऱ्या, तिसऱ्या भाषा शिकणे सोपे होते असे राज्यपालांनी सांगितले.

  सध्या विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजी भाषेकडे अधिक आहे. त्यामुळे भाषा रक्षणासाठी काम करताना युवकांनी प्रवाहाविरुद्ध जाण्याची तयारी ठेवावी असे राज्यपालांनी सांगितले.

  मराठी साहित्य जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच युवा लेखक व कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठी साहित्य संकेतस्थळ सुरु केले असल्याचे प्रवर्तक अक्षय पुंड यांनी सांगितले.

  यावेळी संकेतस्थळाचे सहसंस्थापक अनमोल कुलकर्णी, गीतकार जगदीश खेबुडकर यांचे नातू पंकज खेबुडकर, हरिप्रिया, प्रसाद, अजित, श्रीराम, राधा व स्वप्नील हे उपस्थित होते.