बंद

    20.02.2024: महाराष्ट्र विध‍िमंडळाच्या विशेष अधिवेशनातील मा. राज्यपालांचे अभिभाषण

    प्रकाशित तारीख: February 20, 2024

    सभापती महोदय, अध्यक्ष महाराज व राज्य विधानमंडळाचे सन्माननीय सदस्यहो,
    राज्य विधानमंडळाच्या २०२४ या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपणा सर्वांचे स्वागत करताना, मला अतिशय आनंद होत आहे.
    २. माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचे सतत अनुसरण करीत आहे.
    3. माझे शासन, प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद सोडवण्याच्या दृष्टीने, माननीय सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडीत आहे.
    4. महाराष्ट्र शासन, सीमावर्ती भागात राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांच्या हितासाठी शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे.
    5. महाराष्ट्र, हे देशातील एक अग्रगण्य औद्योगिक राज्य आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा १४.२ टक्के इतका आहे आणि भारताच्या एकूण निर्यातीपैकी महाराष्ट्राचा वाटा १७.३ टक्के इतका असून निर्यातीत देखील महाराष्ट्र आघाडीवर आहे.
    6. माझ्या शासनाने, 2027-28 पर्यंत देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या उद्दिष्टाशी अनुरूप अशी राज्याची एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
    या वर्षी, सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत ६१,५७६ कोटी रुपये इतकी गुंतवणूक असलेले ७५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे, राज्यामध्ये ५३,००० पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
    7. देशात थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र सर्वोच्च स्थानावर आहे. राज्यात, ६५,५०0 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक, देशाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या ३८.७८ टक्के इतकी आहे.
    8. माझ्या शासनाने, जानेवारी २०२४ मध्ये, दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सामंजस्य करार केले असून, त्यामुळे राज्यामध्ये दोन लाख नोकऱ्या निर्माण होतील.
    9. माझ्या शासनाने, राज्याची निर्यात क्षमता वाढविण्यासाठी राज्याचे पहिले, “महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३” जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने, नवी मुंबईतील महापे औद्योगिक क्षेत्रात, ५०,००० कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीतून जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यात येईल. त्यातून, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे एक लाख रोजगार निर्माण होतील.
    माझ्या शासनाने, नांदगाव पेठ, अमरावती येथे “पीएम मित्र पार्क” उभारण्यासाठी १००० एकर जमीन संपादित केली आहे. त्यातून, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे २२०० रोजगार निर्माण होतील.
    माझ्या शासनाने, बल्क ड्रग पार्क उभारण्यासाठी रायगड जिल्ह्यातील दिघी येथे १००० हेक्टर जमीन राखून ठेवली आहे.
    10. माझ्या शासनाने, “एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८” घोषित केले आहे. त्यातून, २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि पुढील पाच वर्षांत राज्यात सुमारे ५ लाख नोकऱ्या निर्माण होतील. सदर धोरणामध्ये सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात आला आहे.
    11. माझ्या शासनाने, राज्याला हरित हायड्रोजन व त्याचे तत्सम पदार्थ निर्माण करणारे आघाडीचे राज्य बनविण्यासाठी “हरित हायड्रोजन धोरण-२०२३” आखले आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड व सहा खाजगी विकासक यांच्याबरोबर २,७६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पासंदर्भातील सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे 64,000 इतक्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
    12. माझ्या शासनाने, ग्रामीण भागातील युवकांमध्ये, रोजगारासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करण्याकरिता ग्रामीण भागात, ५११ इतकी “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे” स्थापन केली आहेत.
    13. माझ्या शासनाने, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांमधील नक्षलग्रस्त क्षेत्रातील युवकांना सक्षम करण्यासाठी आणि रोजगार देण्यासाठी “कौशल्य विकास कार्यक्रम” सुरू केला आहे. तसेच, गडचिरोली येथे दोन नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.
    14. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता माझ्या शासनाने, या वर्षी, १ लाख ५३ हजारांपेक्षा अधिक रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
    15. माझ्या शासनाने, ज्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी निर्गमित केली होती, मात्र, जे दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत रुजू झाले आहेत अशा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर, जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
    १6. माझ्या शासनाने, २०२३-२४ या वर्षात राज्यभरात ४२4 रोजगार मेळावे आयोजित केले, त्यामध्ये, 24,००० पेक्षा अधिक उमेदवारांची विविध नोकऱ्यांसाठी निवड करण्यात आली. तसेच, डिसेंबर, २०२३ मध्ये नागपूर येथे राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये, ११,००० पेक्षा अधिक उमेदवारांची, विविध नोकऱ्यांसाठी निवड करण्यात आली.
    17. माझ्या शासनाने, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या संकेतस्थळावर ३१ लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी केली आहे. सुमारे, ७ लाख ११ हजार बांधकाम कामगारांना, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून ९४१ कोटी रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे.
    18. माझ्या शासनाने, राज्यातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ आणि विविध उद्योगांशी संलग्न असलेली ३९ आभासी मंडळे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
    19. माझ्या शासनाने, ठाणे शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. माझ्या शासनाने, अमरावती व नांदेड या शहरांमध्ये देखील सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
    20. माझ्या शासनाने नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक आरोग्य, कृषी, वाहतूक नियंत्रण, देखरेख व संनिरीक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र ड्रोन अभियानाला मान्यता दिली आहे.
    21. माझे शासन, जिल्हा रुग्णालये, सर्वोपचार रुग्णालये व इतर शासकीय आरोग्य केंद्रे यांमध्ये सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यास कटिबध्द आहे.
    माझ्या शासनाने, “महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना” व “आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” या दोन्हीं योजनांचे एकत्रीकरण करून, राज्यातील सर्व शिधा पत्रिकाधारक व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांचा समावेश करण्यासाठी त्यांची व्याप्ती वाढविली आहे. वार्षिक विमा संरक्षण, प्रती कुटुंब, 1 लाख 50 हजार रुपयांवरुन 5 लाख रुपये इतके वाढविले आहे.
    22. माझ्या शासनाने, सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेसाठी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत, मुंबईत, ३० बहुविधचिकित्सालयांसह २२० आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत आणि ५ बहुविधचिकित्सालये व निदान केंद्रांसह ४३ आरोग्य केंद्रे उभारण्याचे नियोजित आहे. याद्वारे, मोफत वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार, रक्त चाचण्या आणि विशेषज्ञांचा सल्ला, अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून मुंबईत राहणाऱ्या ३५ लाखांहून अधिक व्यक्तींना याचा लाभ झाला आहे.
    23. राज्याच्या उर्वरित भागात, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना” या उपक्रमांतर्गत, १५ लाखांहून अधिक रूग्णांना वैद्यकीय सहाय्य पुरविणारी ३४७ आरोग्य केंद्रे उघडण्यात आली आहेत.
    २4. माझ्या शासनाने, “महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना” अंतर्गत राज्यातील ६१ लाख ५६ हजार कुटुंबे जोडली आहेत. शासनाने, समुदाय संसाधन व्यक्तीचे मानधन ३,००० रुपयांवरून ६,००० रुपये इतके वाढविले आहे आणि स्वयंसहाय्यता गटांचा फिरता निधी १५,००० रुपयांवरून ३०,००० रुपये इतका वाढविला आहे.
    25. “स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-दोन” या अंतर्गत, 90,000 वैयक्तिक घरगुती शौचालये आणि 2600 सार्वजनिक स्वच्छता संकुले बांधण्यात आली आहेत आणि 28,300 गावे “हागणदारीमुक्त गावे” म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
    २6. माझ्या शासनाने, “बाळासाहेब स्मृती मातोश्री ग्राम पंचायत बांधणी योजने” अंतर्गत, ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना, २० लाख रुपये आणि २००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना, २५ लाख रुपयाचे सुधारित अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    २7. माझ्या शासनाने, “प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण” आणि इतर राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी, राष्ट्रीय गृहनिर्माण दिनी, “महा आवास अभियान, २०२३-२४” सुरू केले आहे.
    28. माझे शासन, राज्यातील ४०९ शहरांमध्ये, “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)” प्रभावीपणे राबवित असून १५ लाखांहून अधिक घरांना मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने, या उपक्रमासाठी, २९०९ कोटी रुपयांचे नियतवाटप केले आहे, तसेच महाराष्ट्र निवारा निधीतून २८७३ कोटी रुपये आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून ७८२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
    २9. माझ्या शासनाने, देशातील सर्वात जास्त लांबीचा असलेला सागरी मार्ग, “अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू” पूर्ण केला आहे आणि १३ जानेवारी, २०२४ पासून तो जनतेसाठी खुला केला आहे.
    30. माझे शासन, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा” विस्तार करीत आहे. त्या अनुषंगाने, सिंदखेडराजा ते शेगावपर्यंत चौपदरी महामार्ग, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर आणि नागपूर-गोंदिया तसेच जालना ते नांदेड या द्रूतगती महामार्गांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.
    31. माझ्या शासनाने, आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने, ४५१ किलोमीटर रस्त्यांचा विकास केला आहे. नाबार्डच्या कर्ज सहाय्य योजनेअंतर्गत, २४७० किलोमीटर रस्त्यांची सुधारणा केली आहे आणि ७३१ पुलांचे काम पूर्ण केले आहे. हायब्रीड ॲन्युइटी प्रकल्पांतर्गत, ६७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण केले आहे.
    32. माझ्या शासनाने, राज्य शासनाचा हिस्सा म्हणून, जालना – जळगाव या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी 3,552 कोटी रुपये आणि नांदेड – बिदर या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी 750 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
    33. माझ्या शासनाने, ५७०० गावांमध्ये “जलयुक्त शिवार अभियान २.०” हा दुसरा टप्पा सुरू केला आहे.
    34. माझे शासन, राज्यातील अति उपसा झालेल्या, तीव्र व अंशत: तीव्र पाणलोट क्षेत्रातील, 13 जिल्हयांच्या 43 तालुक्यांमधील 1442 गावांमध्ये “अटल भूजल योजना” राबवित आहे. लोक सहभागातून सर्व 1133 जल सुरक्षा आराखडे तयार करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे.
    35. माझ्या शासनाने, 21 जिल्हयांमध्ये हवामान विषयक अनुकूलता व शेतकऱ्यांची नफा क्षमता वाढविण्यासाठी 6,000 कोटी रुपये खर्चाच्या “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-दोन” ला तत्वत: मान्यता दिली आहे.
    36. माझ्या शासनाने, “प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने” अंतर्गत, २७ प्रकल्पांना आणि “बळीराजा जलसंजीवनी योजने” अंतर्गत ९१ प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सध्या, दोन्ही योजनांच्या माध्यमातून ५ लाख ३१ हजार हेक्टर इतकी संयुक्त सिंचन क्षमता साध्य करण्यात आली आहे.
    37. माझ्या शासनाने, १३ लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी ८०,००० कोटी रुपये खर्चाच्या, ६८ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
    38. माझ्या शासनाने, सार्वजनिक-खासगी भागीदारीतून “उदंचन साठवण प्रकल्प” तसेच उपसा सिंचन यंत्रणा व “अन्य अपारंपरिक ऊर्जा मिश्र प्रकल्प” विकसित करण्यासाठी एक धोरण तयार केले आहे.
    39. माझ्या शासनाने, राज्यात, सौर ऊर्जा पंप बसविण्यामध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
    40. माझ्या शासनाने, कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०” सुरू केली आहे. २०२५ पर्यंत, अंदाजे 7000 मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्माण करून किमान 30 टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जाकरण करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
    41. माझ्या शासनाने, नागपूर, काटोल, कळमेश्वर, मोर्शी व संग्रामपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
    42. माझ्या शासनाने, “पीक विमा योजने” अंतर्गत, केवळ एक रुपया भरून, शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. 2023 मधील खरीप हंगामामध्ये, 1 कोटी 71 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत आणि 113 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनींना विमा संरक्षण मिळाले आहे. 2023 च्या खरीप हंगामाकरिता, शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा 1,550 कोटी रुपये इतका विमा हप्ता, शासनाने प्रदान केला आहे. 2023 च्या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे संकटात असलेल्या 48 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 2,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची नुकसानभरपाई प्रदान केली आहे. 2023-24 च्या रब्बी हंगामामध्ये, 71 लाखांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले आणि 49 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रास विमा संरक्षण मिळाले आहे.
    43. माझ्या शासनाने, शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. “प्रधानमंत्री किसान सम्मान योजना” व “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या अंतर्गत, राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना, दरवर्षी 12,000 रुपये इतकी एकूण रक्कम देण्यात येईल.
    44. माझे शासन, पीक कर्ज घेतलेल्या आणि त्या कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने” अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबवित आहे. उक्त योजनेअंतर्गत आधार प्रमाणित 14 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5000 कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.
    45. माझ्या शासनाने, नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट निधी जमा करण्यासाठी थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणाली मार्च, 2023 पासून अंमलात आणली आहे. आधार क्रमांकाच्या माध्यमातून ओळख पटविल्यानंतर, ३825 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम 44 लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात सुलभतेने जमा करण्यात आली आहे.
    46. माझ्या शासनाने, “किमान आधारभूत किंमत योजने”अंतर्गत, धान उत्पादक शेतकऱ्यांना, प्रति हेक्टरी २०,००० रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम कमाल दोन हेक्टर मर्यादेपर्यंत, देण्याची घोषणा केली आहे.
    47. माझ्या शासनाने, राज्यातील बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या तसेच वेतनी कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या 1 लाख रुपये इतक्या मर्यादेपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे 3 कोटी ठेवीदारांना होणार आहे.
    48. माझे शासन, शिक्षणेतर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी या हेतूने, सर्व शाळांमध्ये, “मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा” मोहीम राबवित आहे.
    49. माझे शासन, 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून “एक राज्य, एक गणवेश योजना” राबवित आहे. सदर योजनेअंतर्गत, शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या पहिली ते आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश तसेच, बूट व पायमोज्यांची जोडी देण्यात येत आहे.
    50. माझ्या शासनाने, ठाणे, पालघर, अमरावती, वर्धा, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम, जालना व हिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
    51. माझ्या शासनाने, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत, सावळी विहीर, तालुका- राहाता, जिल्हा अहमदनगर येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
    52. महाराष्ट्राचे महान खेळाडू आणि भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू, दिवंगत श्री. खाशाबा जाधव यांच्या स्मृती सन्मानार्थ, माझ्या शासनाने, १५ जानेवारी हा त्यांचा जन्म दिवस, दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
    53. मला सांगताना विशेष आनंद होत आहे की, चीनमधील हांगझोऊ येथे पार पडलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्रातील खेळाडूंनी १५ सुवर्ण, ७ रौप्य व ४ कांस्य पदकांसह एकूण २६ पदके पटकावत नेत्रदीपक यश मिळवले आहे.
    याच ठिकाणी पार पडलेल्या १९व्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी असामान्य कौशल्य दाखवत, २ सुवर्ण, २ रौप्य व ७ कांस्य पदकांसह ११ पदके जिंकली आहेत.
    याशिवाय, गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, २०२३ मध्ये, महाराष्ट्राने ८० सुवर्ण, ६९ रौप्य व ७९ कांस्य पदकांसह एकूण २२८ पदके मिळवून उत्कृष्ट कामगिरी करीत पदकांच्या यादीत अव्वल स्थान मिळविले आहे.
    54. माझ्या शासनाने, नाशिक येथे १२ ते १६ जानेवारी, २०२४ या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे.
    55. कुणबी नोंदी असलेला अभिलेख शोधण्यासाठी आणि मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती घटित करण्यात आली होती आणि त्यानुसार, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीची प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत.
    56. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम, राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, शासन, आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे.
    57. माझ्या शासनाने, मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील 75 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात जाऊन पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करण्यासाठी “महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना” सुरू केली आहे.
    58. माझ्या शासनाने, सारथी संस्थेच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, लातूर, नागपूर, पुणे विभागीय व उपकेंद्र कार्यालये यांच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
    59. माझ्या शासनाने, “अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा” मार्फत 17,500 पेक्षा अधिक मराठा समाजातील लाभार्थ्यांना, त्यांच्या व्यावसायिक कर्जाकरिता व्याज परतावा म्हणून 232 कोटी रुपये वितरित केले आहेत.
    60. माझ्या शासनाने, “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने” अंतर्गत, इतर मागासवर्ग, निरधिसूचित जमाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गांतील ज्या विद्यार्थ्यांना, शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवासव्यवस्था व इतर शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी भत्त्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
    61. माझ्या शासनाने, विदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्त्यांची संख्या, ५० वरून ७५ पर्यंत वाढविली आहे.
    62. माझ्या शासनाने, गुरव, लिंगायत, नाभिक, रामोशी व वडार समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, प्रत्येक महामंडळाला, ५० कोटी रुपये इतके भाग भांडवल मंजूर करण्यात आले आहे.
    63. माझे शासन, इतर मागासवर्ग, निरधिसूचित जमाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी पुढील तीन वर्षांत १० लाख घरे बांधण्यासाठी, राज्यात “मोदी आवास गृहनिर्माण योजना” राबवित आहे. या योजनेअंतर्गत, १२,००० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
    64. माझ्या शासनाने, दिव्यांगजनांच्या उन्नतीसाठी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” ही प्रभावी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत, २८ जिल्ह्यांचा समावेश केला असून ८५,००० पेक्षा अधिक दिव्यांगजनांना याचा लाभ झाला आहे.
    65. माझ्या शासनाने, विविध गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमिनी देताना दिव्यांगजनांसाठीचे आरक्षण ३ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत वाढविले आहे.
    66. माझ्या शासनाने, मानसिक आजारातून बरे झालेल्या व पुढील उपचारांची गरज नसलेल्या अथवा बेघर किंवा कुटुंबाने नाकारलेल्या व्यक्तींसाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ठाणे, रत्नागिरी, पुणे व नागपूर येथे सहा पुनर्वसन गृह उभारण्याची योजना सुरू केली आहे.
    67. माझ्या शासनाने, “संजय गांधी निराधार अनुदान योजना” आणि “श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना” या अंतर्गत, एकाकी वृद्ध व्यक्ती, विधवा आणि दिव्यांग व्यक्ती यांसारख्या ४५ लाख लाभार्थ्यांसाठीच्या आर्थिक सहाय्यात १,००० रुपयांवरून १,५०० रुपये इतकी वाढ केली आहे. माझे शासन, या योजनेसाठी सुमारे 6,000 कोटी रुपये इतका खर्च करीत आहे.
    68. माझ्या शासनाने, “मुख्यमंत्री वयोश्री योजने” अंतर्गत राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे उद्भवणाऱ्या शारीरिक अपंगत्व व अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना 3 हजार रुपये एकवेळ एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
    69. माझ्या शासनाने, 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आतापर्यंत, या योजनेचा लाभ 26 कोटी वेळा ज्येष्ठ नागरिकांनी घेतला आहे.
    70. “महिला सन्मान योजने” अंतर्गत, माझे शासन, महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना तिकिटाच्या दरामध्ये 50 टक्के सवलत देत आहे.
    सदर योजने अंतर्गत आजतागायत, 51 कोटींपेक्षा अधिक वेळा महिलांनी लाभ घेतला असून, त्यासाठी 1461 कोटी रूपये इतके सवलत मूल्य देण्यात आले आहे.
    71. माझ्या शासनाने, पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये, १ एप्रिल, २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थी मुलीला, तिच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत, वयाच्या विविध टप्प्यांवर एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहेत.
    72. माझ्या शासनाने, पर्यटन क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी “महिला-केंद्रित पर्यटन धोरण” आखले आहे.
    73. माझ्या शासनाने, “राष्ट्रीय महिला सुरक्षा अभियाना”अंतर्गत, महिला व बालकांवरील अपराधासंदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी, १३८ विशेष जलदगती न्यायालयांमध्ये ४१४ नियमित पदे निर्माण करण्यासाठी आणि 690 पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
    74. माझ्या शासनाने, कुपोषण व रक्तक्षय दूर करण्यासाठी, लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना “पोषणतत्त्वगुणसंवर्धित तांदूळ” वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत, सर्व जिल्ह्यांमध्ये १२ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक पोषणतत्त्वगुणसंवर्धित तांदळाचे वाटप करण्यात आले आहे.
    75. माझ्या शासनाने, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती, दिवाळी व श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा यानिमित्ताने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना तसेच शेतकरी आत्महत्याप्रवण 14 जिल्हयांमधील दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांना “आनंदाचा शिधा” या नावाने विशेष शिधा संचांचे वाटप केले आहे.
    76. माझ्या शासनाने, राज्यामध्ये “शासन आपल्या दारी” हा कल्याणकारी उपक्रम सुरू केला असून, त्याचा दोन कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे.
    77. माझ्या शासनाने, मराठवाडयाच्या सर्वांगीण विकासासाठी 46,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची विकास कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
    78. माझ्या शासनाने, “मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षा” निमित्त, मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील ऐतिहासिक बलिदानाच्या व विजयाच्या स्मृती जतन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य स्मारक उभारण्याकरिता 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
    79. माझ्या शासनाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त, २ जून, २०२३ पासून शिवराज्याभिषेक महोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शासनाने, अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमध्ये शिवचरित्राची निर्मिती सुरू केली आहे.
    80. वाघनखे भारतात परत आणण्यासाठी, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम, लंडन यांच्यामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, नागपूर व मुंबई या चार शहरांमध्ये प्रस्तावित शिव शस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनात वाघनखे प्रदर्शित करण्याचा माझ्या शासनाचा मानस आहे.
    81. माझ्या शासनाने, मोठ्या ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना अ-वर्ग” यासाठीच्या निधीची मर्यादा “2 कोटी रूपये ते 25 कोटी रूपये” वरून “५ कोटी रूपये ते २५ कोटी रूपये” इतकी वाढविली आहे. तसेच, माझ्या शासनाने, लहान ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब-वर्ग” या साठीच्या निधीची मर्यादा, २ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपये इतकी वाढविली आहे.
    82. माझ्या शासनाने, मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांचे संवर्धन, जतन व सक्षमीकरण करण्यासाठी आणि उच्च शिक्षणात मराठी भाषेची अभिवृद्धी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे “मराठी भाषा विद्यापीठ” स्थापन करण्याकरिता महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ अधिनियम, २०२३ अधिनियमित केला आहे.
    83. माझ्या शासनाने, सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय यांचा मराठी भाषेत अनुवाद करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. याशिवाय, सॉफ्टवेअरच्या मदतीने मराठीमध्ये अनुवादित करण्यात आलेल्या प्रतींची तपासणी व पडताळणी करण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे ३०० मनुष्यबळ पुरविण्यात येत आहे.
    84. माझ्या शासनाने, अन्य राज्यातील मराठी भाषिक लोकांसाठी, मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भाषिक उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्याकरिता महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली व गोवा यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
    85. माझ्या शासनाने, चर्नी रोड, मुंबई येथील मराठी भाषा भवनाचे बांधकाम आराखडे सुधारित केले असून त्यानुसार अंदाजे 250 कोटी रूपये इतक्या बांधकाम खर्चाची इमारत उभारण्यात येणार आहे.
    सन्माननीय सदस्यहो, या विशेष अधिवेशनामध्ये, आपण सहभागी होऊन, महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठीच्या प्रस्तावांवर आपली अभ्यासपूर्ण मते मांडाल, असा मला विश्वास वाटतो.
    पुन्हा एकदा, आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
    जय हिंद !
    जय महाराष्ट्र!