बंद

    20.01.2024: ‘पोलो हा राजा महाराजांचा खेळ न राहता जनसामान्यांचा खेळ व्हावा : राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: January 21, 2024

    ‘पोलो हा राजा महाराजांचा खेळ न राहता जनसामान्यांचा खेळ व्हावा : राज्यपाल रमेश बैस

    पोलो खेळाची सुरुवात भारतात झाली असे मानतात. आज हा खेळ जागतिक झाला आहे. साहस, धैर्य, गती व कौशल्य यांचा या खेळात मिलाफ आहे. परंतु ऐतिहासिक कारणांमुळे हा खेळ राजा महाराजांचा आहे असे म्हणून पहिले जाते. ही धारणा बदलून हा खेळ जनसामान्यांचा झाला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    आदित्य बिर्ला समूहातर्फे आयोजित आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप अंतिम स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. २०) राज्यपाल बैस यांच्या हस्ते महालक्ष्मी रेस कोर्स येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    राज्यपालांच्या हस्ते डायनॅमिक्स अचिव्हर्स या विजेत्या संघाला आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप देण्यात आला. विजेत्या संघाने मुंबई पोलो संघाला हरवत ७ – ६ अंकांनी सामना जिंकला.

    पोलो व हॉर्स रेसिंग हे खेळ महाराष्ट्राला आंतर राष्ट्रीय नकाशावर आणू शकतात. या खेळाच्या माध्यमातून रोजगाराच्या देखील अनेक संधी निर्माण होऊ शकतात. उद्योगपती दिवंगत आदित्य बिर्ला यांच्या स्मृती प्रित्यर्थ पोलो कप सुरु केल्याबद्दल समूहाचे अभिनंदन करताना आगामी काळात ‘आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप’ ही स्पर्धा भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा होईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

    सुरुवातीला राज्यपालांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील अंतिम सामना डायनॅमिक्स अचिव्हर्स व मुंबई पोलो या संघांमध्ये खेळण्यात आला. सामन्याचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते मैदानात चेंडू फेकून करण्यात आले. डायनॅमिक्स अचिव्हर्स संघाने ७ -६ अंकांनी हा सामना जिंकला.

    सामन्यानंतर राज्यपालांच्या हस्ते दोन्ही संघांमधील खेळाडूंचा तसेच पंचांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी आदित्य बिर्ला समूहाच्या संचालिका राजश्री बिर्ला, समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, समूहाच्या व्यवसाय आढावा परिषदेचे अध्यक्ष ए के अगरवाला, अमेच्युअर रायडर्स क्लबचे अध्यक्ष श्याम मेहता, उपाध्यक्ष नासिर जमाल, माजी अध्यक्ष सुरेश तापुरीया आदी उपस्थित होते.