बंद

    19.02.2021 : ‘छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत’: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: February 19, 2021

    ‘छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत’: राज्यपाल

    छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नव्हे; तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आज शिवजयंती देशाच्या कानाकोपर्‍यात साजरी केली जाते. शिवजयंती निमित्त त्यांचे पुण्यस्मरण करताना सर्वांनी त्याग, समर्पण व एकात्म भावनेने देशासाठी कार्य केल्यास देशाचा सन्मान वाढेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    श्री जय जलाराम राम रोटी भंडार ट्रस्ट व नरसिंह स्वराज रक्षक फाउंडेशनच्या वतीने महावीर नगर, कांदिवली, मुंबई येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.

    यावेळी खासदार गोपाल शेट्टी, आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, सुनील राणे व भाई गिरकर तसेच ट्रस्टचे अध्यक्ष धर्मानंद रतुडी महाराज व स्वराज रक्षक फाउंडेशनचे सूर्या रतुडी प्रामुख्याने उपस्थित होते.

    भारतात अलेक्झांडर, औरंगजेब यांसारखे अनेक अन्यायी शासक येऊन गेले. परंतु देश सहिसलामत राहिला. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला शक्ती आणि युक्तीने नामोहरम केले. पूर्वजांचे स्मरण ठेवण्याची भारताची परंपरा असल्याचे सांगून त्याचसाठी महापुरुषांच्या जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. जे राष्ट्र आपल्या पूर्वजांना विसरते, ते राष्ट्र नष्ट होते, असे राज्यपालांनी सांगितले.

    सुरूवातीला राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी करोना काळात सेवाभावनेने कार्य करणार्‍या करोना योद्ध्यांचा तसेच मेधावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.