बंद

    18.11.2023 : राज्यपालांच्या उपस्थित नौदलातर्फे आयोजित जी – २० प्रश्नमंजुषेची राष्ट्रीय अंतिम फेरी संपन्न

    प्रकाशित तारीख: November 18, 2023

    शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रेरित करावे: राज्यपाल रमेश बैस

    राज्यपालांच्या उपस्थित नौदलातर्फे आयोजित जी – २० प्रश्नमंजुषेची राष्ट्रीय अंतिम फेरी संपन्न

    भारतीय नौसेनेतर्फे जी – २० देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित आंतरशालेय प्रश्नमंजुषा ‘थिंक – क्विझ’ ची राष्ट्रीय पातळीवरची अंतिम फेरी राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. १८) गेटवे ऑफ इंडिया येथे संपन्न झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डीएव्ही पब्लिक स्कुल गुरुग्रामच्या विजयी चमूला सन्मानित करण्यात आले.

    अंतिम फेरीतील प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार, आयोजक संस्था ‘नेव्ही वेलफेयर अँड वेलनेस असोसिएशन’च्या अध्यक्षा श्रीमती कला हरी कुमार, मुंबईतील नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, नौदलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसेच विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

    प्रश्नमंजुषा हा ज्ञानवर्धक खेळ आहे. मात्र प्रश्नमंजुषेनंतरही, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. अर्जुनाने भगवान कृष्णांना प्रश्न विचारल्यामुळेच भगवद गीतेचे तत्वज्ञान प्रकट झाले. प्रश्न विचारणे हे अज्ञानाचे प्रतीक नसून आत्मज्ञानाचा मार्ग असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    जी – २० शिखर परिषदेच्या सफल आयोजनानंतर जगाच्या भारताप्रती असलेल्या दृष्टिकोनामध्ये परिवर्तन आले आहे. आज भारताच्या मताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गांभीर्याने ऐकले जाते. देशाचा वाढलेला आत्मविश्वास चांद्रयानची अभियानाची सफलता, आशियाई क्रीडा स्पर्धेमधील उत्कृष्ट प्रदर्शन व क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीतून दिसून येत असल्याचे सांगून जी – २० प्रश्नमंजुषेच्या आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये देखील भारतीय चमूने त्याच आत्मविश्वासाने प्रदर्शन करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    ‘G -20’ प्रश्नमंजुषेची आंतरराष्ट्रीय फेरी इंडिया गेट दिल्ली येथे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.