बंद

    18.04.2023 : उत्तम संसदपटू होण्यासाठी जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची राज्यपालांची सूचना

    प्रकाशित तारीख: April 18, 2023

    ‘अभिरूप युवा संसदेच्या प्रतिनिधींनी साधला राज्यपालांशी संवाद’

    उत्तम संसदपटू होण्यासाठी जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची राज्यपालांची सूचना

    भारत आज जगातील सर्वाधिक युवा देश म्हणून उदयास आला आहे. आगामी काळात सरकार तसेच लोकशाही संस्थांचे नेतृत्व युवक-युवतींना करावे लागणार आहे. या दृष्टीने युवकांनी संसदीय लोकशाही समजून घेणे अवश्य आहे. चांगला संसदपटू होण्यासाठी सभागृहात जनतेचे कोणते प्रश्न उपस्थित करावे तसेच ते प्रभावीपणे कसे मांडावे या दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासन व युनिसेफ महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या युवकांच्या अभिरुप संसदेच्या सदस्यांनी मंगळवारी (दि. १८) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

    जी व्यक्ती देशसेवा, धर्मकार्य व समाजकार्य या विषयात काम करते, त्या व्यक्तीला समाज अनेक वर्षे लक्षात ठेवतो, असे सांगून युवकांनी सर्वप्रथम देशाचा विचार करावा, असे राज्यपालांनी सांगितले. कुणालाही एक दिवसात राजकीय नेता होता येत नाही. जी व्यक्ती समाजाच्या सुखदुःखात सहभागी होते, अडीअडचणीत धावून जाते, तिला लोकच पुढे आणतात, असे सांगून ज्याला राजकारणात पुढे जायचे आहे त्याने प्रामाणिक राहिले पाहिजे तसेच सेवाभावाने काम केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

    युवक हे देशाचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी संसदीय लोकशाहीच्या कार्यान्वयनात रुची घ्यावी. या दृष्टीने अभिरूप संसद हा चांगला उपक्रम असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ रामेश्वर कोठावळे, युनिसेफ महाराष्ट्राच्या अधिकारी डॉ स्वाती महापात्रा तसेच राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून आलेले अभिरुप संसदेचे ७५ सदस्य उपस्थित होते.

    राज्यातील युवक युवतींना संसदीय लोकशाही प्रणालीची ओळख व्हावी व त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे या उद्देशाने रासेयो स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या अभिरुप संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन मुंबई विद्यापीठाच्या कलिना शैक्षणिक संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे.