17.08.2024: विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपालांकडून पुष्पवृष्टी
विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपालांकडून पुष्पवृष्टी
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप
मुंबई, दि. 17 : अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती आदी यावेळी उपस्थित होते.
मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मान्यवरांनी यावेळी प्रशासनाच्या वतीने चौपाटीवर उभारण्यात आलेल्या विविध मंडपांना भेट देऊन गणरायांची आरती केली. तसेच देश विदेशातून आलेल्या गणेश भक्तांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.