17.02.2025: राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मराठी साहित्य संमेलन गीताचे राजभवन येथे उदघाटन संपन्न

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मराठी साहित्य संमेलन गीताचे राजभवन येथे उदघाटन संपन्न
राज्यपाल, उदय सामंत यांच्या उपस्थितीत ‘आम्ही असू अभिजात’चे प्रकाशन
नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे प्रकाशन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. १७) राजभवन मुंबई येथे करण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रित करण्यात आलेल्या या गीतासोबत राज्याचा गौरवशाली इतिहास दाखविण्यात आला आहे.
सन २०२४ या वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे हे वर्ष मराठी भाषेकरिता अतिशय संस्मरणीय झाले असे सांगून आता मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.
इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी सर्वांनाच कसोशीने प्रयत्न करावे लागतील नाहीतर प्रादेशिक भाषा केवळ बोलण्याच्या भाषा राहतील असे राज्यपालांनी सांगितले.
मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, यांची भाषा असून या भाषेसोबत नैतिक मूल्ये व संस्कार जोडले असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची देखील भाषा असून त्यांचे समाजासाठी योगदान अनन्यसाधारण असे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काही पिढ्या गेल्यानंतर आपण आपली संस्कृती विसरून गेलो असतो व इतर संस्कृती अंगिकारली असती असे राज्यपालांनी सांगितले.
तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी फार लढावे लागले होते व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तामिळ भाषेला अभिजात दर्जा बहाल केला होता असे सांगून मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केल्याबद्दल राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र शासनाचे आभार मानले.
पंतप्रधान स्वतः प्रादेशिक भाषांचा संवर्धनाला प्रोत्साहन देत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
‘आम्ही असू अभिजात’ या संमेलन गीताचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर, संगीतकार आनंदी विकास, गायक मंगेश बोरगावकर, समन्वयक विकास सोनताटे, तसेच आयोजक संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
संमेलन गीत ज्येष्ठ गायक हरिहरन, शंकर महादेवन, प्रियंका बर्वे, मंगेश बोरगावकर, शमीमा अख्तर आदींनी गेले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.