बंद

    17.02.2025 : अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महिला विद्यापीठाने शाळांशी संपर्क वाढवावा: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: February 17, 2025
    17.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

    अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महिला विद्यापीठाने शाळांशी संपर्क वाढवावा: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    आपल्या स्थापनेचे १०९ वे वर्ष साजरे करीत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील, विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील, शाळांशी संपर्क वाढवावा, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

    राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला विद्यापीठाचा ७४ वा दीक्षांत समारोह विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात सोमवारी (दि. १७) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    महिला विद्यापीठाने नुकतेच चंद्रपूर येथे उपकेंद्र सुरू केले असल्याचे नमूद करून विद्यापीठाने आदिवासी भागातील मुलींची उच्च शिक्षणातून होणारी गळती कमी करण्याच्या दृष्टिने या संपूर्ण समस्येचे अध्ययन करावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांशिवाय विद्यार्थिनींना कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा व्यवस्थापन आदी क्षेत्रातील आधुनिक पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    पदवीधर विद्यार्थिनींनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले उद्दिष्ट निश्चित करावे त्या दृष्टीने कठोर परिश्रम करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

    प्रत्येकाला निसर्गाने वेगवेगळी कौशल्ये, क्षमता दिल्या असल्यामुळे कोणीही इतरांशी तुलना करीत बसू नये व आपल्या गतीने आपले निर्धारित उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी स्नातकांना केली.

    स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही, परंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस किंवा इतर परीक्षा उत्तीर्ण कराव्या. मात्र समाजातील अशिक्षित तसेच गोरगरीब महिलांची काळजी घ्यावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    *विद्यापीठांनी आपले शैक्षणिक वेळापत्रक पुरेसे अगोदर तयार करुन जाहीर करावे, तसेच सर्व परीक्षांच्या व दीक्षांत समारोहाच्या तारखा अगोदरच जाहीर कराव्या, असे राज्यपालांनी सांगितले*

    समाज एका महिलेला सुशिक्षित करतो त्यावेळी तिच्या सर्व भावी पिढ्यांना सुशिक्षित करीत असतो, असे सांगताना यशस्वी महिलांनी आपला काही वेळ समाजातील उपेक्षित महिलांच्या कल्याणासाठी द्यावा तसेच आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करू नये असे उद्गार एकात्मिक संशोधन आणि विकास कृतीच्या कार्यकारी संचालिका डॉ. ज्योती पारिख यांनी यावेळी काढले.

    कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या अहवालात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विदेशी विद्यापीठांशी सहकार्य, हवामान बदल या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिसंवाद, विद्यापीठाने क्रीडा तसेच इतर क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

    दीक्षांत समारोहाला डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, माजी कुलगुरू डॉ. चंद्रा कृष्णमूर्ती, विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. रूबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक, अधिष्ठाता आणि विभाग प्रमुख, शैक्षणिक आणि अशैक्षणिक कर्मचारी, तसेच स्नातक उपस्थित होते.

    दीक्षांत समारोहात १५,३९२ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण ४६ संशोधकांना पीएचडी प्रदान करण्यात आली तर ७७ स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.