बंद

  १७.०१.२०२० बचतगट चळवळीतून महिलांनी उद्योग-व्यवसायांचे मालक बनावे- राज्यपाल

  प्रकाशित तारीख: January 17, 2020

  बचतगट चळवळीतून महिलांनी उद्योग-व्यवसायांचे मालक बनावे

  – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

  महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ, देशभरातील बचतगट, महिला कारागीर सहभागी

  मुंबई, दि. 17 : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधत उद्योग-व्यवसायांचे मालक बनले पाहिजे. आर्थिक समृद्धी आता फक्त मुंबईसारख्या महानगरांमध्येच मर्यादीत न राहता ती गावागावातील गोरगरीब महिलांच्या घरातही पोहोचली पाहिजे, अशी भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.

  वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर देशभरातील बचतगट आणि महिला कारागिरांच्या विविध उत्पादनांचे ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे, त्याचा प्रारंभ राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी श्री.कोश्यारी बोलत होते. प्रदर्शनात महाराष्ट्रासह 29 राज्यातील बचतगट सहभागी झाले असून हे प्रदर्शन 29 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले असेल.

  राज्यपाल म्हणाले, एखाद्या कंपनीच्या उत्पादनापेक्षा बचतगटांनी तयार केलेल्या कोणत्याही उत्पादनात आपुलकीची भावना सामावलेली असते, त्यामुळेच बचतगटांच्या महिलांनी तयार केलेले रागीचे बिस्कीट खाताना आईने बनविलेला पदार्थ खात असल्याचा आनंद मिळतो. बचतगटांच्या महिला मेहनतीने आणि प्रामाणिकपणे उत्पादनांची निर्मिती करतात. यापुढे कोणत्याही सरकारी कार्यक्रमात महिला बचतगटांनी तयार केलेली उत्पादने वापरण्यात यावीत अशा सूचना देण्यात येतील, असेही श्री.कोश्यारी सांगितले.

  केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, महिला बचतगटांद्वारे उत्पादीत वस्तुंचा दर्जा चांगला असतो. कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा फसवणूक त्यात नसते, त्यामुळे लोकही विश्वासाने या वस्तू खरेदी करतात. बचतगट चळवळीचे हे फार मोठे बलस्थान आहे, असे त्यांनी सांगितले.

  राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यातील बचतगटाची चळवळ ही देशात अग्रक्रमावर आणण्याचा आमचा ध्यास आहे. उमेद अभियानांतर्गत राज्यात आतापर्यत 4.23 लाख बचतगटांची स्थापना झालेली असून त्यामाध्यमातून 45 लाख कुटुंबे अभियानाशी जोडली गेली आहेत. अभियानामार्फत जवळपास 823 कोटी रुपये एवढा समुदाय निधी तर बॅंकामार्फत 6 हजार 600 कोटी रुपयांचे कर्ज बचतगटांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अभियानांतर्गत 10.83 लाख कुटुंबांनी उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले असून त्या माध्यमातून जवळपास 1 हजार 70 कोटी रुपयांचे उत्पन्न निर्माण झाले आहे. गावपातळीवर जवळपास 40 हजार प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती कार्य करत आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

  राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मुंबईतील महालक्ष्मी सरस प्रदर्शन दरवर्षी यशस्वी होत आहे. आता गावातील महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी तालुका आणि जिल्हास्तरावरही बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाईल. शहरांमध्येही यासाठी व्यवस्था निर्माण करु. बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येतील, असे श्री.सत्तार यांनी सांगितले.

  कार्यक्रमास माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, आमदार रमेश पाटील, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, नाबार्डचे महाप्रबंधक सी. उदय भास्कर यांच्यासह देशभरातील बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या.

  बचतगटांना विविध पुरस्कार

  राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचतगटांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. क्रांती स्वयंसहाय्यता समुह (खोडशी, जि. सातारा), प्रज्ञाशिल स्वयंसहाय्यता समुह (राहुलनगर, जि. औरंगाबाद), एकविरा स्वयंसहाय्यता समुह (सिंधीमेघे, जि. वर्धा), यक्षणी स्वयंसहाय्यता समुह ( माणगाव, जि. सिंधुदूर्ग), ओमसाई स्वयंसहाय्यता समुह (पाडळदे, जि. धुळे), आदर्श स्वयंसहाय्यता समुह (जामोद, जि. बुलढाणा) यांना विभागस्तरीय प्रथम पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याशिवाय जिल्हास्तरीय विविध पुरस्कारांचेही मान्यवराच्या हस्ते वितरण झाले.

  प्रदर्शनात 29 राज्यातील बचतगट सहभागी

  प्रदर्शनात महाराष्ट्रासह 29 राज्यातील बचतगट सहभागी झाले आहेत. 511 स्टॉल असून त्यापैकी 70 स्टॉल खाद्यपदार्थाचे आहेत. शॉपींगची आवड असलेल्या व्यक्ती आणि खवय्यांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वांद्रे (पूर्व) येथील बीकेसीमधील एमएमआरडीए मैदान क्रमांक 1,4,5 आणि 6 येथे 29 जानेवारीपर्यंत सुरु असेल. प्रदर्शन सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामुल्य आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.

  जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे आणि कोल्हापुरचा तांबडा – पांढरा

  ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, ग्रामीण भागातील खाद्य पदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. यामध्ये जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी व तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा – पांढरा रस्सा, सोलापुरची शेंगाचटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ इत्यादी बाबी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय कोल्हापुरी चप्पल, आदीवासी कलाकुसरीच्या वस्तू, पैठणी साड्या यांसह देशातील विविध २९ राज्यातील कारागिरांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करता येणार आहेत.

  ००००