16.09.2022 : “पाठीच्या कण्याच्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये अधिक सहकार्याची गरज” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
“पाठीच्या कण्याच्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये अधिक सहकार्याची गरज” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
जीवनशैलीतील बदलांमुळे पाठीच्या कण्यांचे विकार वाढत आहेत. मात्र त्यासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात नित्यनूतन संशोधन होत आहॆ. भारत पसंतीचे वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर पाठीच्या कण्याच्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये सहकार्य वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
पाठीच्या कण्याच्या तज्ज्ञांच्या ‘न्यूरो स्पायनल सर्जन्स असोसिएशन’ या संस्थेच्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (NSSA Spine 2022) उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १६) मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
उदघाटन समारोहाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ पी.एस. रमणी, अध्यक्ष व्हर्नोन वेल्हो , आयोजक सचिव डॉ सुमित पवार, न्यूरो सर्जन डॉ प्रकाश मोढा आदी उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते लीलावती हॉस्पिटल येथील प्रसिद्ध न्यूरो सर्जन प्रा. डॉ अतुल गोयल यांना डॉ पी एस रमणी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर न्यूरो सर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ इको सुबागिओ व डॉ ऑस्कर एल्विस यांना संस्थेचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले.
राज्यपालांच्या हस्ते डॉ पी एस रमणी यांनी लिहिलेल्या श्रीमद भगवद गीतेवरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पाठीच्या कण्याचे विकार वाढताहेत : डॉ व्हर्नोन वेल्हो
जीवनशैलीतील बदलांमुळे तसेच सुस्त जीवनपद्धतीमुळे पाठीच्या कण्यांचे विकार वाढत आहेत. या विकारांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने डॉक्टरांचे कौशल्य वर्धन केले जात आहे तसेच पाठीच्या कण्याच्या विकारांकरिता सामायिक व्यवस्थापन पद्धती विकसित केली जात आहे. देशात तसेच राज्यात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गरिबांना देखील पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रिया करता येत आहेत अशी माहिती डॉ व्हर्नोन वेल्हो यांनी यावेळी दिली.