बंद

    16.03.2024 : भूतान मध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांची माहिती

    प्रकाशित तारीख: March 16, 2024

    भूतान मध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांची माहिती

    भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचे देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी आज येथे केले. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरु झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.

    जानेवारी महिन्यात पंतप्रधान झाल्यावर आपल्या पहिल्याच भारत भेटीवर आलेले भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे व त्यांच्या पत्नी ओम ताशी डोमा यांचे शनिवारी (दि. १६ मार्च) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शासनाच्या वतीने राजभवन, मुंबई येथे स्वागत केले, त्यावेळी ते बोलत होते.

    मुंबईत आज फिक्कीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात टूर ऑपरेटर्स तसेच व्यापार व वाणिज्य प्रतिनिधींसोबत बैठक झाल्याचे सांगून महाराष्ट्र व भूतान मध्ये उभय पक्षी पर्यटन वाढविण्याबाबत आपण कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान छेरिंग तोबगे यांनी राज्यपालांना सांगितले.

    भूतानचे लोक भारतीय चित्रपटांचे दर्दी असून भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण आमच्या देशात करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानला लवकरच भेट देणार असल्याचे आपल्याला आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

    महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतात सर्वात मोठी असून भूतानचे अनेक शुभचिंतक महाराष्ट्रात असल्याचे पंतप्रधान छेरिंग तोबगे यांनी सांगितले.

    भूतानचे अनेक पर्यटक महाराष्ट्रातील अजंता व वेरूळ लेण्यांना भेट देतात व अनेकांना महाराष्ट्रात येण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

    भूतानचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असून हजारो मुले एनडीए येथून लष्करी प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. आपली देखील एनडीए मधून प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपण पुणे येथे येऊ शकलो नाही असे तोबगे यांनी सांगितले.

    आपल्या पहिल्याच भारत भेटीमध्ये महाराष्ट्र भेटीवर आल्याबद्दल भूतानच्या पंतप्रधानांचे आभार मानून, राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने भूतान व महाराष्ट्रातील शैक्षणिक आदान प्रदान वाढवावे, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी व्यक्त केली.

    भूतानची ‘सकल आनंद निर्देशांक’ ही संकल्पना अतिशय स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे सांगून महाराष्ट्रातील अनेक लोकांना एकदा तरी भूतानला भेट देण्याची इच्छा असते, असे राज्यपालांनी सांगितले.

    संस्कृती व भाषा एकमेकांना जोडते असे सांगून मुंबईत भूतानचा सांस्कृतिक महोत्सव व्हावा व तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक महोत्सव भूतानमध्ये व्हावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी पंतप्रधान दाशो छेरिंग तोबगे आणि त्यांच्यासोबत आलेल्या भूतानच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राजभवनातील ‘जल विहार’ सभागृहात शाही मेजवानीचे आयोजन केले.

    यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, भूतानचे परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धूनग्याल, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री ल्योंपो जेम शेरिंग, उद्योग आणि वाणिज्य आणि रोजगार मंत्री ल्योनपो नामग्याल दोरजी, भूतानचे भारतातील राजदूत मे.जन. वेटसोप नामग्येल, परराष्ट्र सचिव ओम पेमा चोडेन, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि निमंत्रित उपस्थित होते.