बंद

    16.02.2021: करोनाची इतिश्री अद्याप झाली नाही; त्यामुळे सातत्याने सावधगिरी बाळगण्याचे राज्यपालांचे आवाहन

    प्रकाशित तारीख: February 16, 2021

    करोनाची इतिश्री अद्याप झाली नाही; त्यामुळे सातत्याने सावधगिरी बाळगण्याचे राज्यपालांचे आवाहन

    करोना संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आले. मात्र करोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. करोनाचे संकट कधीपर्यंत चालेल हे आज कुणीही खात्रीने सांगू शकत नाही. यास्तव सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने करोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

    अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने राजभवन येथे मंगळवारी (दि.१६) विविध क्षेत्रातील ३५ करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    करोनाच्या देशभरातील केसेस एकेवेळी दिवसाला ९५००० होत्या, त्या आता १५००० पेक्षा कमी झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र, केरळ यांसह काही राज्यात करोनाचे रुग्ण पुनश्च वाढत आहेत, याकडे लक्ष वेधून करोनासंदर्भात बेफिकीरीने न राहता सावधगिरी बाळगून परंतु निर्भयतेने काम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    जगाच्या तुलनेत भारतात करोना रुग्णांची तसेच बळींची संख्या कमी होती. देशातील समाज सेवक, शासकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मी यांनी करोना काळात अतिशय सुंदर काम केले व त्यांना देशातील दानशूर व्यक्तींनी चांगले सहकार्य केले. त्यामुळेच भारत करोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करू शकला असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुनिता सुमन सिंह व प्रताप सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्र कुमार सिंह व्यासपीठावर उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते सायन इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. मोहन अच्युत जोशी, केईएमचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, शुश्रुषा हॉस्पिटलचे डॉ हर्षद शाह, डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. विभा अग्रवाल, समाज सेवक इक्बाल इस्माईल ममदानी, रुग्णवाहिका चालक अनिल आदिवासी, उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, वडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे यांसह इतर करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

    **