बंद

    16.01.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत श्री बालाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

    प्रकाशित तारीख: January 16, 2024

    राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत श्री बालाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

    विकसीत भारताचे उद्दीष्ट गाठण्यासाठी विद्यापीठांची महत्वाची भूमिका-राज्यपाल

    पुणे दि.१६: विकसीत भारताचे उद्दीष्ट गाठण्यासाठी देशातील विद्यापीठांची महत्वाची भूमिका असून स्नातकांनी देशाच्या अमृतकाळातील प्रत्येक क्षण या उद्दीष्ट प्राप्तीसाठी समर्पित करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

    श्री बालाजी विद्यापीठाच्या तिसऱ्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होत. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू बी.परमानंदन, कुलपती डॉ.जी.के.शिरुडे, कुलसचिव डॉ.एस.बी.आगाशे, परीक्षा नियंत्रक डॉ.मित्तल मोहिते, अधिष्ठाता डॉ.डिंपल सैनी, डॉ.बीजू पिल्लई आदी उपस्थित होते.

    विकसीत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण महत्वाचे आहे. यादृष्टीने बालाजी विद्यापीठानेदेखील ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर द्यावा. आपला पदवी अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी विद्यार्थ्यांना असे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील.

    आज वेगवान प्रगतीसाठी जगात‘मल्टिटास्किंग’ आणि ‘मल्टिस्किलींग’ आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंग संदर्भात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षीत करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करावे. विद्यापीठांनी माजी विद्यार्थ्यांसोबत प्रसिद्ध उद्योगपती, गायक, कलाकार, व्यावसायिक नेतृत्वाला विद्यापीठात आमंत्रित करून विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांनीदेखील विद्यापीठाशी असलेले नाते कायम ठेवून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

    यशस्वी स्नातकांचे अभिनंदन करताना राज्यपाल श्री.बैस म्हणाले, बालाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाने शिक्षणासोबत भारतीय मूल्य आणि संस्कृतीवर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही विद्यापीठ पुढे आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या संवादन कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासावर दिलेला भर त्याचप्रमाणे विद्यार्थींनींसाठी ५० टक्के जागा आरक्षित ठेवणे विशेष असेच आहे अशा शब्दात त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. स्नातकांनी देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

    कुलगुरू डॉ.परमानंदन म्हणाले, अपयश यशाची पहिली पायरी असून चुकांमधून विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे. ध्येय निश्चित करुन मार्गक्रमण केल्यास यश नक्कीच मिळते. विद्यार्थी यशस्वी झाले तर देशाची प्रगती होईल आणि देश पुढे जाईल. देशासाठी काय करता येईल याचा विचार करावा आणि त्यानुसार प्रत्येकाने प्रयत्न करावे असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    कुलगुरु डॉ.जी.के.शिरुडे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा अहवाल सादर केला.

    पदवी, पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

    कार्यक्रमाला विविध विद्या शाखांचे संचालक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.