बंद

  15.12.2020 : स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण

  प्रकाशित तारीख: December 15, 2020

  स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण

  राज्यातील स्काऊट गाईड कार्याची राज्यपालांकडून प्रशंसा

  मुंबई दि 15 – स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्काऊट आणि गाईडचा मुख्य आश्रयदाता म्हणून पद ग्रहण करणे हा आपला सन्मान असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे सांगितले.

  महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्काऊट प्रतिज्ञा घेऊन समारंभपूर्वक पदग्रहण केले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईडचे मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी राज्यपालांना मानचिन्ह आणि स्कार्फ प्रदान केला.

  आपण ६० वर्षांपूर्वी शालेय जीवनात स्काऊटचे सदस्य होतो याचे स्मरण देऊन आज अनेक वर्षांनी स्काऊट चळवळीशी पुन्हा जोडले जात असल्याचा आनंद होत आहे असे राज्यपालांनी सांगितले.

  देशातील ४७ लाख स्काऊट – गाईडपैकी १४ लाख सदस्य एकट्या महाराष्ट्राचे आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून राज्यात स्काऊट आणि गाईडचे कार्य चांगले सुरु असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

  समाजसेवा ही ईश्वरसेवा असून, यामुळे आपल्यात शुद्ध भाव निर्माण होण्यास मदत होते. हे निस्वार्थ काम आपल्याला आत्मिक आनंद देत असते. स्काऊट आणि गाईडने करोना महामारीच्या काळात सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले व भविष्यातही आपले कार्य असेच सुरू राहील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

  मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी सांगितले की टाळेबंदीच्या काळात स्काऊट गाईडतर्फे स्वत: मास्क तयार करून वितरीत करण्यात आले आहेत. अन्न धान्य वाटपाचे कार्यक्रमही देशभर आयोजीत करण्यात आले होते. याचबरोबर ऑनलाईन कार्यक्रमातही स्काऊट गाईडने सहभाग नोंदविला असून, भविष्यातही समाजाप्रती कार्य असेच कार्य सुरू राहिल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र स्काऊटचे राज्य सचिव संजय महाडिक यांनी आभार प्रदर्शन केले.