बंद

  15.10.2020: रुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धे ‘देवदूत’ राज्यपालांचे गौरवोद्गार

  प्रकाशित तारीख: October 15, 2020

  रुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धे ‘देवदूत’ राज्यपालांचे गौरवोद्गार

  मुंबई, दि. 15 : कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना जीवनदान देणारे आरोग्य सेवेतील कोरोना योद्धे हे देवदूत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. गौरविण्यात आलेल्या कोरोना योद्ध्याला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची घोषणा देखील राज्यपालांनी यावेळी केली.

  राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात कोरोना साथरोग नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्या राज्यातील विविध आरोग्य सेवकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

  यावेळी डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यानिक अधिकारी, सफाई कामगार, आशा कार्यकर्ती, कक्षसेवक, भट्टीचालक, क्ष-किरण अधिकारी, परिसेविका अशा सुमारे 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास आणि अवर सचिव अर्चना वालझाडे या दोघांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

  राज्यपाल म्हणाले, कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्याच्या पहिल्या दिवसापासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मैदानात उतरलेत आणि कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले. कोरोना रुग्णांची सेवा करणारे हे योद्धे देवदूत आहेत. त्यांचे कौतुक करायला शब्द देखील कमी पडतील, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

  ज्याप्रमाणे सीमेवर लढून सैनिक देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे कोरोना योद्ध्यांनी रुग्णांचे रक्षण करुन त्यांना जीवनदान देण्याचे काम केले आहे. सर्वांनी नेहमी चांगला विचार करा. चांगले काम करा. सकारात्मक विचार करत रहा, असा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला.

  कोरोना रुग्णांची सेवा करताना ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यांना राज्यपालांनी यावेळी श्रद्धांजली अपर्ण केली.

  आरोग्यमंत्री श्री.टोपे यावेळी म्हणाले, आज झालेला हा सत्कार वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचाच त्यापैकी काहींचा प्रातिनिधिक सत्कार येथे करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडे सामान्य माणूस आशेने पाहत असून त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागत, आस्थापूर्वक चौकशी करीत रुग्णांना बरे करुया, असे आवाहन आरोग्यमंत्र्यानी यावेळी केले. राज्यातील रुग्णांना अधिक चांगली आणि दर्जेदार सेवा देण्याकरिता मिशन मोडवर काम करु, अशी ग्वाहीही आरोग्यमत्र्यांनी यावेळी दिली.

  कोरोनापासून बचावासाठी स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे असून मास्कचा वापर, फिजीकल डिस्टसींग आणि सॅनिटायझरचा वापर या गोष्टी आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

  कोरोनाच्या लढाईमध्ये आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांनी जोरदार लढाई लढली असून राज्यामध्ये बऱ्याच अंशी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

  यावेळी डॉ.व्यास यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती अंबेकर यांनी केले.
  ००००