बंद

  15.03.2021 : एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

  प्रकाशित तारीख: March 15, 2021

  एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

  ‘लहान विद्यापीठे प्रगतीची शिखरे सर करतील : राज्यपाल

  राज्यातील काही पारंपारिक विद्यापीठांच्या अधिपत्याखाली आज ७०० ते ८०० महाविद्यालये संलग्न आहेत. अश्या विद्यापीठांचे व्यवस्थापन करणे कठीण जाते. त्याउलट लहान आकाराच्या समूह विद्यापीठांचे व्यवस्थापन सुलभ पद्धतीने होत असून त्याठिकाणी गुणवत्ता राखणे तसेच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणे शक्य होते. राज्यातील चांगल्या महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठे तयार केल्यास अशी लहान विद्यापीठे प्रगतीची शिखरे निश्चितच सर करतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  नव्याने सुरु झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. १५) राजभवन येथे संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

  बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, कुलगुरू डॉ. दिनेश पंजवानी, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विश्वस्त अनिल हरीश, मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. नरेश चंद्र व विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

  आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी शिक्षणातून यंत्रमानव तयार करायचे नसून चारित्र्यसंपन्न नागरिक घडवायचे आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांनंतर शिक्षकांना महत्वाचे स्थान दिले आहे असे सांगून शिक्षकांनी आपल्या स्नेहपूर्ण आचरणातून विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

  एचएसएनसी समूह विद्यापीठ योग, संगित, बांधकाम व्यवसाय, उपयोजित विज्ञान, परफोर्मिंग आर्ट आदी नवनवे अभ्यासक्रम सुरु करीत असल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना उच्च ध्येय व उद्देश्य पुढे ठेवून काम केल्यास विद्यापीठाला मोठी सफलता मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

  हार्वर्ड विद्यापीठाशी सहकार्य

  एचएसएनसी समूह विद्यापीठ हार्वर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने दूरस्थ अभ्यासक्रम राबविण्याबद्दल प्रयत्नशील आहे अशी माहिती विद्यापीठाचे प्रमुख निरंजन हिरानंदानी यांनी यावेळी दिली.

  एचएसएनसी विद्यापीठांतर्गत एच.आर. महाविद्यालय, के.सी. महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज या नामांकित महाविद्यालयांचा समावेश असून करोना काळात सर्व महाविद्यालयांनी आपले संपूर्ण अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने पूर्ण केले तसेच परीक्षा यशस्वीरित्या घेतल्या अशी माहिती हिरानंदानी यांनी दिली.