15.01.2021 : संस्कृत भाषा संशोधनासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आग्रही
15.01.2021
कालिदास संस्कृत विद्यापीठाचा राष्ट्रनिर्माणात वाटा असावा
संस्कृत भाषा संशोधनासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आग्रही
ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञान -स्त्रोत केंद्राचे लोकार्पण
नागपूर, दि. 15 : संस्कृत ही देशातील सर्व भाषांचा आत्मा आहे. भारतातील प्राचीन साहित्याचा समृध्द ठेवा मोठ्या प्रमाणात संस्कृत भाषेमध्ये आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याचे काम कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात व्हावे. त्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात विश्वविद्यालयाने वाटा उचलावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात श्री. कोश्यारी यांच्या हस्ते ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञान -स्त्रोत केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. या केंद्रामध्ये संस्कृत भाषेच्या संशोधनाचे कार्य होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. सी. जी. विजयकुमार, ज्ञानयोगी डॉ. जिचकार ज्ञान-स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. दीपक कापडे, सांदिपनी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री जिचकार उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून या विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्रकुमार, महाराष्ट्र पशु तथा मत्स्य संवर्धन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, वर्धाच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विश्वविद्यालयाचे कुलगुरु रजनीश शुक्ल, उच्च तथा तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक महेश साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता संजय दशपुते, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथाणी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सर्व कुलगुरूंच्या उपस्थितीची नोंद घेत, देशभरातील सर्व भागांमध्ये संस्कृतमध्ये उपलब्ध असलेल्या संदर्भग्रंथाचा अभ्यास राष्ट्रनिर्माणासाठी झाला पाहिजे, असे आवाहन केले. बदलत्या काळात वेद, आयुर्वेद नव्या परिवर्तनाची नांदी ठरू शकतात. प्रधानमंत्र्यांनी स्वदेशी संशोधनाला देखील मोठ्या प्रमाणात सन्मान दिला आहे. अशावेळी आपल्या जुन्या ग्रंथातून ज्ञानवृद्धी होत असेल तर त्यासाठी या विद्यापीठात संशोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठीच्या प्रयत्नांना गतिमान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आपल्या भाषणात त्यांनी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत आदराने उल्लेख केला. त्यांच्या अल्पायुषी पण मात्र देदीप्यमान कारकीर्दीची तुलना त्यांनी स्वामी विवेकानंद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनक्रमाशी केली. काही व्यक्ती बहुआयामी प्रतिभेचे धनी असतात. ते अल्पकाळासाठी मात्र विशिष्ट कार्य करण्यासाठी अवतरतात. जिचकारांचे अवेळी जाणे दुःखद असले तरी त्यांनी निर्माण केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगून या विद्यापीठामार्फत त्यांच्या दिशा निर्देशानुसार कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्रीमती राजश्री जिचकार यांनी त्यावेळी संबोधित केले. सर्व भाषांची जणनी असणारी संस्कृत भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातली जावी. त्या संशोधनातून समाजाचे भले व्हावे, अशी श्रीकांत जिचकार यांची इच्छा होती. त्यातूनच या विद्यापीठाची निर्मिती झाली आहे. विद्यापीठ त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार वाटचाल करत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी, श्री. वरखेडी यांनी संस्कृत विद्यापीठाच्या मार्फत सुरू असलेल्या संशोधनाचा आढावा सादर केला. तसेच या विद्यापीठामार्फत संस्कृतमधील वृत्तवाहिनी सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. या विद्यापीठाच्या निर्मितीमागील भूमिका व संदर्भ त्यांनी यावेळी मांडले. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संस्कृतमध्ये संचलन डॉ. पराग जोशी यांनी केले.
विद्यापीठातील कार्यक्रमानंतर राज्यपालांनी भोसलेकालिन सुप्रसिद्ध गड मंदिराला भेट दिली. त्यांनी गड मंदिराचा व परिसराचा इतिहास जाणून घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक स्वर्गीय गोळवलकर गुरुजी यांच्या रामटेक येथील जुन्या निवासस्थानाला देखील त्यांनी यावेळी भेट दिली.