बंद

    14.04.2025: लोकसंख्या, महानगरांची उर्ध्व दिशेने होणारी वाढ, औदयोगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: April 14, 2025
    Governor inaugurates the State level Fire Service Week

    लोकसंख्या, महानगरांची उर्ध्व दिशेने होणारी वाढ, औदयोगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    अग्निशमन संशोधन संस्था निर्माण करण्याचे आवाहन

    राज्यातील ८ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान

    वाढती लोकसंख्या, महानगरांची उर्ध्व दिशेने होणारी वाढ तसेच वाढती औदयोगिक क्षेत्रे यामुळे आग व इतर आपत्तींना तोंड देणे आव्हानात्मक झाले आहे. रसायनांमुळे उद्भवणाऱ्या आगी, औद्योगिक अपघात, नैसर्गिक संकट तसेच अतिरेकी हल्ल्यांमुळे अग्निशमन दलापुढे नवनवी आव्हाने ठाकत आहेत. या परिस्थितीत अग्निशमन सेवा दलापुढे पायाभूत सेवा-सुविधांचे रक्षण करणे, सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा जपणे व औद्योगिक संपदेचे संरक्षण करणे ही महत्वाची जबाबदारी आली आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

    राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. १४) राजभवन मुंबई येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    मुंबई अग्निशमन दलातील तसेच राज्याच्या इतर महानगर पालिका येथील ८ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.

    अग्निशमन कार्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तसेच ड्रोनचा वापर वाढविण्याबाबत अग्निशमन विभागाने गांभीर्याने विचार केला पाहिजे असे सांगताना दलाने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निरंतर कौशल्य वर्धन व प्रशिक्षण केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. .

    मुंबईसारख्या महानगरांमध्ये गृहनिर्माण संस्थांना अग्नी सुरक्षे संबंधी जनजागृती कार्यात सहभागी करून घेतले पाहिजे तसेच गृहनिर्माण संस्था व औद्योगिक आस्थापनांचे नियमित फायर ऑडिट झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    अग्निशमन संशोधन संस्था निर्माण करा

    अग्निशमन या विषयाचे सर्वंकष अध्ययन करण्यासाठी एक संशोधन संस्था निर्माण केली पाहिजे, अग्निशमन कार्यात नवनवे तंत्रज्ञान वापरले पाहिजे तसेच अग्निशमन कार्यासाठी पर्यावरण स्नेही अग्निरोधक विकसित केले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    अग्निशमन कार्यात सेवानिवृत्त अग्निशमन अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये युवकांसाठी कमी मुदतीचे अग्निशमन अभ्यासक्रम सुरु केले पाहिजे असे राज्यातील २९ सार्वजनिक विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपणास वाटते असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांनी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी दीपक घोष, सब ऑफिसर सुनिल गायकवाड, लिडींग फायरमन पराग दळवी, फायरमन तातु परब, पुणे महानगरपालिकेतील फायर इंजिन वाहनचालक करीमखान पठाण, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेतील फायरमन कसप्पा लक्ष्मण माने व पुणे महानगरपालिकेतील फायर अटेंडण्ट नरसिंहा पटेल यांना राष्ट्रपति पदक प्रदान केले.

    यावेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या पोशाखाला अग्निशमन ध्वजाचे तिकीट लावले. राज्यपालांनी अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान दिले तसेच जनतेला निधीसाठी अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले.

    कार्यक्रमाला मुंबई अग्निशमन दलाचे, औद्योगिक आस्थापनांचे तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अग्निशमन अधिकारी उपस्थित होते.

    मुंबई डॉकयार्ड येथे सन १९४४ साली झालेल्या जहाजावरील स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो तसेच या दिवसापासून अग्निशमन सप्ताह पाळल्या जातो.