बंद

  13.10.2021: कृतज्ञता सोहळ्यात राज्यपालांकडून नामवंत डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार

  प्रकाशित तारीख: October 13, 2021

  कृतज्ञता सोहळ्यात राज्यपालांकडून नामवंत डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार

  करोनाचा मृत्युदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  जगात करोनाचे थैमान सुरु असताना भारतात कदाचित सर्वाधिक मृत्युदर राहील अशी परिस्थिती होती. परंतु पीपीई किट परिधान करून डॉक्टर्स, निवासी डॉक्टर तसेच नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मी यांसह सर्व करोना योद्ध्यांनी समर्पण भावनेने अद्भुत काम केल्यामुळेच देशातील मृत्युदर नियंत्रणात राहिला असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  राज्यपाल कोश्यारींच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित ‘कृतज्ञता’ सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा बुधवारी (दि. १३) राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

  करोना काळात सर्वत्र परीक्षा नको असा सूर असताना आपण परीक्षा घेण्याबाबत आग्रही राहिलो आणि वैद्यकीय परीक्षांसह सर्व परीक्षा घेतल्या गेल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही व अधिक डॉक्टर्स उपलब्ध झाले असे राज्यपालांनी सांगितले.

  आजही जगातील करोना केसेसची आकडेवारी चिंताजनक असल्याचे सांगून नागरिकांनी कोविड प्रतिबंधक आचरण पाळण्याबाबत डॉक्टरांनी जनजागृती करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

  जागतिक आकडेवारी नुसार आजही जगात १.७० कोटी ऍक्टिव्ह करोना केसेस असून दररोज ४ लाख केसेस निघत आहेत. त्यामुळे करोना विरोधातील पवित्रा कायम ठेवावा लागेल असा इशारा नेत्रशल्य चिकित्सक डॉ केकी मेहता यांनी यावेळी दिला.

  राज्यपालांच्या हस्ते डॉ केकी मेहता, डॉ मिलिंद कीर्तने, डॉ शशांक जोशी व डॉ अमित मायदेव, केईएम हॉस्पिटलचे त्वचारोग तज्ञ् डॉ उदय खोपकर, फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक डॉ राहुल पंडित, बीकेसी जम्बो कोविड सेन्टरचे डॉ राजेश ढेरे, वाडीया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिनी बोधनवाला, बॉम्बे हॉस्पिटल चे कान नाक घसा तज्ञ डॉ राजीव नेरुरकर, लीलावती हॉस्पिटलचे डॉ तुषार रेगे, बॉम्बे हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ सुजित कोरडे, रिलायंस हॉस्पिटलच्या डॉ रेखा डावर, बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ विक्रम करमरकर, मित्तल हॉस्पिटलचे डॉ विनायक तायडे यांचा सत्कार करण्यात आला.

  युवा हृदयरोग तज्ञ डॉ समीर पागाद यांनी प्रास्ताविक केले तर राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांनी आभार प्रदर्शन केले.